हिंजवडी (पुणे) : अत्यंत वर्दळीच्या डांगे चौकाला सध्या रिकाम टेकड्या नागरिकांचा विळखा पडला आहे. चौकातील पुलाच्या खांबाला असलेल्या कट्ट्यावर काही काम धंदा नसलेले नागरिक, मद्यपी, गर्दुल्ले, फिरस्ते हे दिवसभर ठाण मांडून बसलेले असतात. यांच्याकडून दिवसभर येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना, वाहनांना नाहक निरखण्याचे प्रकार होत असल्याने नागरिक विशेषतः महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
डांगे चौकातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी याठिकाणी ग्रेड सेप्रेटर करण्यात आले आहे. आयटीपार्ककडे येणारी जाणारी वाहतूक येथील ग्रेड सेप्रेटरमधून मार्गस्थ होत असल्याने डांगे चौकातील वर्दळ तुलनेत कमी झाली आहे. चौकातील पुलाच्या प्रत्येक पिलर भोवती काही निराधार दयनीय अवस्थेतील युवक दिवसभर बसलेले, झोपलेले असतात. यातील अनेक जण नशा केलेल्या अवस्थेत असल्याची चर्चा होत असल्याने या रिकाम टेकड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान, डांगे चौकातून हिंजवडी आयटीपार्क, रावेत, औंध, आणि वाकडकडे जाणारे रस्ते जोडलेले आहेत. चौकात बीआरटी बस स्टॉप असल्याने प्रवाशांची नेहमी याठिकाणी वर्दळ असते. स्वतःचा टाइमपास करण्यासाठी अनेक भटके येथील चौकात दिवसभर बसलेले असतात. चौकाचे विद्रुपीकरण करणारे तसेच येणाऱ्या-जाणाऱ्यांची नाहक टेहळणी करणाऱ्या रिकाम टेकड्यांचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.