देहूरोड : मुंबई-पुणे महामार्गाच्या देहूरोड भागात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अर्धवट असून, गेल्या वर्षी पुलाजवळून नव्याने बनविण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावर एक किलोमीटर अंतरापर्यंत विविध ठिकाणी खड्ड्यांची मालिका तयार झाली आहे. रस्त्याची अक्षरश:चाळण झाली होती. खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. दुचाकी वाहने घसरून अपघात होऊ लागले होते.याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार संबंधित ठेकेदाराने महामार्गावरील धोकादायक बनलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती सुरू केली आहे.
खड्डे बुजविण्यात येत असल्याने वाहतुकीचा वेग वाढला असून, स्थानिक नागरिक, कामगारवर्ग व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. देहूरोड बाजारपेठ भागात गेल्या वर्षी पुलाचे व एलिव्हेटेड रस्त्याचे कामासाठी जुन्या महामार्गाच्या दोन्ही बाजूनी नव्याने डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता़ मात्र रस्ता बनविल्यानंतर विविध ठिकाणी लहानमोठे खड्डे पडले होते. खड्डे चुकविताना अपघात होत होते. रस्त्यालगतच्या बाजूपट्ट्या खचल्याने लांबलचक खोलगट चर वजा गटार तयार झाली होती़ त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाणी जाण्यासाठी संबंधितांकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे वाहने रस्त्याच्या खाली उतरविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. परिणामी वाहने आदळून वाहनांचे नुकसान होत होते.दिलासा : डांबरीकरण करून खड्डे बुजविलेगुरुद्वारा ते आयुध निर्माणी प्रवेशद्वारापर्यंत पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने होऊन वारंवार वाहतूककोंडी होत होती. याबाबत लोकमतने ‘रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष’ या शीर्षकाने सविस्तर वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध (दि़ २ नोव्हेंबर) केले होते. या वृताची दखल घेत रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी स्वत: लक्ष घालून मंगळवारी संबंधित कंत्राटदारास रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार धोकादायक खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली असून, येत्या दोन दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.लोकमतने सातत्याने महामार्ग दुरुस्तीबाबत पाठपुरावा केल्याने अखेर संबंधित कंत्राटदाराने महामार्गावरील धोकादायक खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.