रहाटणी : मागील काही दिवसांपासून पावसाने शहरासह परिसरात दमदार हजेरी लावली असल्याने त्याचा परिनाम सर्वच स्तरांतील व्यवसायावर झाला आहे. सततच्या पावसामुळे अनेक कामे मंद गतीने सुरू आहेत. याचा जास्त परिणाम बांधकाम व्यवसायावर झाल्याचे दिसून येत आहे. कारण सध्या मजूर अड्ड्यावर कामाच्या प्रतीक्षेत अनेक मजूर दिवसभर कामाच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. कामाची गती मंदावल्याने कामगारांपुढे अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने कामाच्या शोधात दिवस मजूर अड्ड्यावर काढण्याची वेळ अनेकांवर आली आहे.सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. त्याचा फटका बांधकाम व्यवसायालाही बसला आहे. सध्या सुरू असलेले छोटे-मोठे बांधकाम थांबविले असल्याने मजुरांना काम मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. गावाकडे काम नसल्याने अनेकांनी इथे तरी काम मिळेल असे म्हणत शहराचा रस्ता धरला आहे. मात्र या ठिकाणीदेखील पावसामुळे बरेचसे काम बंद ठेवण्यात आले असल्याने कामगारांना काम नाही. अनेक कामगार मजूर अड्ड्यावर दिवसभर बसून आहेत. रहाटणी फाटा येथील मजूर अड्ड्यावर सकाळी हजारो कामगार कामाच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. यात बिगारी, बांधकाम मिस्त्री, सुतार, प्लंबर, इमारत रंगकाम करणारे, फरशी मिस्त्री यांसह अनेक विविध प्रकारचे काम करणारे कामगार कामाविना कामगार अड्ड्यावर सध्या बसून आहेत. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला, तर या कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.बरेच कामगार येथे भाड्याच्या घरात राहत आहेत. त्याचे अवाच्या सव्वा भाडे, वीजबिल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, महिन्याचा घरातील खर्च याचा ताळमेळ बसवणे कठीण असल्याची भावना काही कामगारांनी बोलून दाखविली आहे. गावाकडे पेरणीचे दिवस असले, तरी अनेकांनी गाव गाठला नाही. कारण यापेक्षाही गावाची परिस्थिती भयानक असल्याने मिळेल ते काम करून गुजराण करण्याच्या हेतूने येथेच राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुरू होती, तीही कामे बंद झाल्याने ‘येथे राहता येत नाही व गावी जाता येत नाही’ अशी काहीशी अनेकांची परिस्थिती झाली आहे.काम मिळेल का काम?सध्या पावसाचे दिवस असल्याने अनेक मजुरांना काम मिळत नसल्याचे भयावह चित्र मजूर अड्ड्यावर दिसून येत आहे. अड्ड्यावर काम मिळत नसल्याने अनेक कामगार शहरातील मोठ-मोठ्या बांधकाम साइटवर जाऊन काम मिळेल काय अशी विचारणा करू लागले आहेत. मात्र, आमच्याकडेच कामगार जास्त झाल्याचे सांगत ठेकेदार वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे कामगारांवर सध्या भटकंतीची पाळी आली आहे. काम मिळत नसल्याने सध्या मिस्त्रीदेखील मिळेल ते काम करण्याची तयारी दाखवीत आहेत. एखादा व्यक्ती मजूर पाहिजे म्हणून कामगार अड्ड्यावर गेला, की त्याच्या भोवती पाच-पन्नास कामगार गोळा होत आहेत. मी येतो, मी येतो अशी ओरड करीत आहेत. एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील कामगार आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे चित्र सध्या आहे.
भाकरीचा चंद्र शोधण्यात जातो दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:31 AM