लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : पालिका प्रशासनाकडून अनेक चौकांत हायमास्ट दिवे लावण्यात आले. हे दिवे रात्री लागणे व दिवसा बंद होणे अपेक्षित आहे. मात्र असे होताना दिसून येत नाही. रहाटणी येथील नखाते वस्ती चौकातील दिवे दिवसभर सुरूच असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. दिवसा उजेड, रात्री अंधार अशी काहीशी परिस्थिती रहाटणी येथे दिसून येत आहे.परिसरात मागील काही दिवसांपासून विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने या परिसरातील नागरिक हैराण आहेत. रात्री-अपरात्री विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने शास्त्रीनगर, गजानननगर, नखातेवस्तीसह रहाटणी परिसरात दिवसातून एक-दोन वेळा रात्री-अपरात्री विद्युतपुरवठा खंडित होत आहे. अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊनही याकडे महावितरण प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे भर दिवसा पथदिव्यांचा विद्युतपुरवठा सुरूठेवत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. अनेक भागात पथदिवे बंद आहेत. ते दुरुस्त करण्याकडे पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाचे लक्ष नाही, तर काही भागात दिवे असूनही नसल्यासारखे आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोकणे चौक ते आकाशगंगा रस्त्यावर पथदिवे संपूर्णपणे झाडांच्या फांद्यांनी झाकले गेले आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर दिवे असूनही अंधार पडतो.
रहाटणीत दिवसा उजेड, रात्री अंधार
By admin | Published: May 11, 2017 4:36 AM