पिंपरी : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात पंचनामा न झाल्याने पाच मृतदेह सात तास तसेच ठेवले. मृत्यूनंतरदेखील मृतांनाही प्रशासनाचा हलगर्जीपणा सहन करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. हा प्रकारी मंगळवारी घडला. शाहूनगर येथील सुभाष पांडुरंग सोनवणे (वय ६०) यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वायसीएममध्ये आणला. त्याचप्रमाणे रामनगर येथील इंद्रभान आनंद भोर (वय ७२) आणि सोनाबाई बापू विटकर (वय ७५) यांचाही दीर्घ आजारांने मृत्यू झाला. याबरोबरच अजून तीन मृतदेह विच्छेदन करण्यासाठी शवागृहात आणले. मात्र सकाळपासून एकही शवविच्छेदन झाले नसल्याने नातेवाइकांनी शवागृहाबाहेर मोठी गर्दी केली होती. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात शवविच्छेदनासंबंधित अहवाल बनविण्यासाठी दरदोज एका पोलीस ठाण्याच्या टीमने कर्तव्य बजावण्याचे ठरले आहे. त्यानुसार आज तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचा नंबर होता. मात्र, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याची टीम दुपारी दोनपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यास विलंब झाला. नातेवाइकांनी शवागृहाबाहेर गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले होते.
दु:खाच्या प्रसंगात क्लेषदायक वागणूकमयत इंद्रभान आनंद भोर यांचे नातेवाईक शरद दौंडकर म्हणाले, ‘‘आम्हाला या घटनेची माहिती मिळताच आम्ही सकाळीच रुग्णालयात दाखल झालो. आम्हाला सकाळी १० वाजेपर्यंत मृतदेह ताब्यात मिळेल असे सांगण्यात आले, मात्र दुपारी दोन वाजले तरी पंचनामा करण्यासाठीही पोलीस आले नाहीत. सगळे नातेवाईक घरी वाट पाहत आहेत. दु:खमध्ये असतानाही आम्हाला प्रशासनाकडून अशी वेदनादायक वागणूक मिळत आहे.’’