पिंपरी : पवना नदीत बुडून महिलेचा मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास थेरगाव केजुबाई बंधाऱ्याजवळ उघडकीस आला. तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर महिलेचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी साडेदहा वाजता एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे चिंचवड अग्निशामक विभागाला कळविण्यात आले. त्यानुसार आग विझविण्याचा बंब आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. चिंचवड मधील केजुबाई बंधारा येथे पाण्याच्या भोवऱ्यावर सुमारे ४० वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. बोटीमधून तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला असता तीन वेळा अडथळे आले. बोट पाण्याच्या भोवऱ्यात अडकू लागली. तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी साडेचार वाजता महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पोहता न आल्याने तिचा मृत्यू झाला असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. सुमारे दोन ते चार दिवसांपूर्वी मावळ भागात पवना नदीमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाला असावा. मृतदेह वाहून चिंचवडला आला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.