देहूगाव : श्री क्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणीच्या पात्रात किनाऱ्यावर अज्ञात कारणाने मृत मासे आढळले असून प्रयत्न पुर्वक वाढविलेल्या महाशीर माशांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जलप्रदुषण हे माशांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असावे असे प्रथमदर्शी दिसत आहे. श्री क्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणी नदीपात्रात फ्रेन्डस् ऑफ नेचर या संस्थेने महाशीर माशांचे बीज सोडून हे माशे प्रयत्न पुर्वक वाढविले होते.
श्री क्षेत्र देहूगाव येथे इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावलेली आहे. अशा परिस्थितीत देहूगावचे सांडपाणी कोणत्याही प्रक्रीये शिवाय थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडले जात आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील गेल्या दोन वर्षापासून सांडपाणी प्रक्रीया (एसटीपी) प्रकल्प तयार झालेला असून मलनिस:रण वाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत. सध्या ठिकठिकाणी या वाहिन्या जोडण्याचे जोडकाम अंतिम टप्प्यात आहे तर घरातील मैलापाणी जोडण्यास अद्याप सुरवातकरण्यात आलेली नाही. हाच प्रकल्प वेळेत पुर्ण झाला असता तर या माशांचा जीव निश्चितपणे वाचला असता अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
गावातील संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त मधुकर मोरे व सर्व विश्वस्त , इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानात काम करणारे सोमनाथ मुसुडगे, पोलीस पाटील चंद्रशेखर टिळेकर आदींनी मृत माशांची पाहणी केली.