पिंपरी : सांडपाणी व मलनिस्सारण (ड्रेनेज) वाहिनीमध्ये पुरुष जातीचे सहा महिन्यांचे मृत अर्भक आढळून आले. पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरातील गुरुदत्त नगर येथील नाणेकर चाळीत मंगळवारी (दि. १२) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
पोलिस अंमलदार गणेश परदेशी यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर अतिग्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुदत्त नगरमधील सांडपाणी व मलनिस्सारण वाहिनी तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती दिली. त्यानुसार आरोग्य विभागाचे कर्मचारी मलनिस्सारण वाहिनीमधील कचरा बाहेर काढत असताना त्यांना मृत अर्भक आढळले. बाहुली असल्यासारखे कर्मचाऱ्यांना वाटले. मात्र, ते मृत अर्भक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
मलनिस्सारण वाहिनीमध्ये आढळलेले हे पुरुष जातीचे मृत अर्भक अंदाजे पाच ते सहा महिन्याचे आहे. त्याला जन्म देण्याची इच्छा नसल्याने त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने ड्रेनेजमध्ये टाकून देण्यात आले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पिंपरी पोलिस संबंधित महिलेचा शोध घेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक संदीप देशमुख तपास करीत आहेत.