पिंपरी : हेडफोन आणि इयरफोनमुळे बहिरेपणा वाढत चालला आहे. मोबाइल आणि त्यावर गाणी ऐकणे हे आता काही नवीन नाही. रात्री झोपण्यापूर्वी तर दिवसा वाहन चालवताना बहुतेक जण कानात हेडफोन टाकून गाणी ऐकतात; पण हेडफोनचा अति वापर करणाऱ्यांच्या विशेषतः १८ ते २५ वयोगटांमध्ये बहिरेपणाची लक्षणे दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेडफोन, इयरफोनचे हे आहेत धोके...
९० डेसिबलपर्यंतचा आवाज चेतातंतूंना इजा करतात. यामुळे बहिरेपण येते. धक्कादायक म्हणजे, हेडफोनमधून कानावर २०५ डेसिबल आवाज पडत असल्याने बहिरेपणा येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कानाचे तीन भाग असतात. बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतकर्ण असेही म्हणतात.
काय काळजी घ्यावी?
हेडफोनचा सतत वापर करू नये. हेडफोनचा आवाज त्याच्या क्षमतेच्या सात टक्के ठेवावा. उदा. आवाजाची क्षमता २० असेल तर १२ ठेवावे. हेडफोन एक तासाच्या वर वापरू नये. कानाबाहेर लावता येणाऱ्या हेडफोनचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी हेडफोनचा वाढविलेला आवाज शांत किंचा कमी आवाजाच्या ठिकाणी तो कमी करण्यास विसरू नये.
कानाचे दुखणे घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली...
कानाच्या तज्ज्ञांकडे कानाचे दुखणे व बहिरेपणाची तक्रार घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात सर्वाधिक हेडफोन व इयरफोनचा वापर करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बहिरेपण हे अचानक येत नाही. त्याच्या काही वॉर्निंग आहेत.
सर्वाधिक धोका तरुणांना....
तरुण मुले व मुलींच्या कानाला सतत हेडफोन व इयरफोन दिसून येत आहे. कामात, चालताना, जेवताना त्याच वापर होऊ लागला आहे. गाणी ऐकत झोपल्यामुळे मेंदूचा काही भाग सतत कार्यरत राहतो. त्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. तसेच हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे आरोग्यासाठी हे नुकसानकारक आहे. झोपताना उच्च आवाजात इअरफोन लावून गाणी ऐकल्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात.
मोबाइल किंवा हेडफोनच्या अतिवापरामुळे ‘कंडेक्टिव्ह हेअरिंग लॉस होत नाही; परंतु सेन्सॉरनुरल हेअरिंग लॉस’ होतो. म्हणजे कानाचा नसांवर याचा प्रभाव पडतो आणि कर्णयंत्र वापरण्याशिवाय यावर दुसरा उपचार राहत नाही. यावर शस्त्रक्रिया करून बहिरेपणा दूर करता येऊ शकतो.
- डॉ. परमानंद चव्हाण, कान-नाक-घसा तज्ज्ञ