शिरगाव : बेबेडओहोळ (ता. मावळ) येथे पवना नदीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( ता.१) रोजी दुपारी 12 च्या सुमारास घडली. बुडालेल्या तरुणांपैकी एकाचा मृतदेह शुक्रवारीच तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी आढळून आला. संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे (वय ३२, रा. जवळ, मुळशी) व आर्यन दीपक आलम (वय १३, रा. बेबडओहोळ) अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. हे दोघे काल सकाळी साडेअकराच्या सुमारास नातेवाईकांबरोबर पवना नदीवर पोहायला गेले होते. त्यावेळी ते पाण्यात बुडाले. यातील संतोष घारे यांचा मृतदेह काल हाती लागला तर आर्यनचा मृतदेह शनिवारी(दि.२) सकाळी ६.५० च्या सुमारास आढळून आला. घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर पवना नदीच्या पात्रात आर्यनचा मृतदेह दिसल्याची खबर मंगेश घारे यांनी शिरगाव पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला.संतोष हा विवाहित असून एक दिवसापूर्वी तो बेबडओहोळ येथील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. घरातील पाणी संपल्याने संतोष आणि आर्यन हे नातेवाईकांसह पवना नदीवर पोहण्यासाठी गेले होते. पोहोताना दोघेही पाण्यात बुडाले.याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग पथक लोणावळा आणि मारूंजी येथील पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मंडळाचे अग्निशामक दल तसेच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकांनी दोघांचा शोध घेतला. त्यावेळी संतोषचा मृतदेह लगेच सापडला. मात्र, आर्यनचा शोध लागला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते. अखेर आज सकाळी घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळला. शिरगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत..
मावळ तालुक्यातील बेबेडओहोळ येथे पवना नदीत बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 14:18 IST
घरातील पाणी संपल्याने संतोष आणि आर्यन हे नातेवाईकांसह पवना नदीवर पोहण्यासाठी गेले होते..
मावळ तालुक्यातील बेबेडओहोळ येथे पवना नदीत बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले
ठळक मुद्देपवना नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती शुक्रवारी दुपारी