वाकड : महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे पडवळनगर थेरगाव परिसरात डेंगूचे रुग्ण आढळत आहेत येथील सख्या भावांचा एका महिन्यात डेंगूने अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष पसरला आहे. तसेच या घटनेला जबाबदर असणाऱ्या महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
उजेर हमीद मणियार (वय ४, रा. पडवळनगर, थेरगाव) या चिमुकल्याचे शुक्रवारी (दि १३) पहाटे ४ वाजता मृत्यू झाला तर त्याचाच ९ महिन्याचा लहान भाऊ अदनान हमीद मणियार याचा १६ नोव्हेंबर रोजी दुदैवी अंत झाला. महिना उलटण्याच्या आतच एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने नागरिक हळहळ करत आहेत. तर चिमुकल्याचे वडील हमीद मानियार व आई रिजवाना यांची देखील बिकट अवस्था झाली आहे. याच परिसरात गेल्या आठवड्यात आणखी एका तरुणाला डेंगूची लागण झाली होती. तर मणियार यांच्या मोठ्या भावाची ३ वषार्ची मुलगी देखील तापाने फणफणली आहे. या परिसरात गेल्या आठ महिन्यापूर्वी जुने पिण्याच्या पाण्याचे पाईप काढून नवीन टाकण्यात आले मात्र हे काम करताना जुने कनेक्शन मात्र आहे त्या अवस्थेत सोडण्यात आले त्यामुळे एकीकडे येथे अनेक ठिकाणी स्वच्छ पाण्याचे डबके साचूननागरिकांसाठी घातक अशा डेंग्यूची उत्पत्ती होत आहे तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. तर ड्रेनेजचे खड्डेही अर्धवट सोडण्यात आल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पडवळ नगर, दगडू पाटील नगर वहीनी साहेब कॉलनी यासह हा प्रभाग क्रमांक २३ चा सुमारे २० हजार लोकसंख्येचा परिसर येथे सर्वजण मध्यम वर्गीय आणि मोलमजुरी करणारे नागरीक वास्तव्य करतात. मात्र, या परिसरात महापालिकेचे आणि स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याचे सांगत अनेकदा तक्रारी करूनही याभागात धुरीकरण, साफ सफाई, झाडू, ड्रेनेज व गटार स्वच्छता कचऱ्याची विल्हेवाट आदी कामे केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी संतप्त नातेवाईकांसह जमावाने केली आहे.