पिंपरी-चिंचवड (वाकड) : पोहण्याचा सराव करणाऱ्या आयटी अभियंत्यांचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकड येथील खाजगी जिममध्ये शुक्रवारी (दि ११) रात्री साडे आठच्या घडली.
गट्टूबल्ली भार्गव (वय २४, रा हिंजवडी, मूळ आंध्रप्रदेश) असे त्याचे नाव आहे. गट्टूबल्ली याने येथील सिल्वर जिममध्ये एक महिन्याचा पोहणे शिकण्याचा क्लास लावला होता. गेल्या ८ मेला त्याचा हा क्लास पूर्ण झाला. त्या काळात तो पोहायलादेखील शिकला होता. यानंतर तो सरावासाठी जिममधील जलतरण तलावात येऊन एकटाच सराव करीत असे. शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास तो लाईफ जॅकेटसह तरण तलावात उतरला आणि सराव करताना अचानक पाण्यात बुडाला. येथील कर्मचाऱ्यांनी त्याला पाण्याबाहेर काढले मात्र तोपर्यंत वेळ झाला होता. पोहायला येत असताना नेमका तो दम लागल्यामुळे बुडाला की अन्य काही कारण आहे हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले. गट्टूबल्ली भार्गव हा हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीत आयटी अभियंता म्हणून नोकरी करीत होता. याबाबत त्यांच्या घरच्यांना पोलिसांनी कळविले आहे.