निगडी : मी त्या दिवशी कामाला गेलो नसतो, तर माझी आई त्या दिवशी सुट्टी घेणार होती, मी कामाला गेलो म्हणून तीपण कामाला गेली, मी घरी असतो तर माझी आय वाचली असती, असे म्हणत आगीमध्ये आई गमावल्यानंतर तिच्या लेकराने स्मशानभूमीत टाहो फोडला.
तळवडे येथील स्पार्कल कॅण्डल कारखान्यात आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या सेक्टर २२ येथील मंगल खरबडे यांच्या अंत्यविधी वेळी त्यांचा मुलगा प्रफुल्ल खरबडे याने टाहो फोडला. मंगल खरबडे या आपल्या मुलासोबत निगडीतील सेक्टर २२ येथे राहत होत्या. एका वर्षापूर्वी त्यांच्या एका मुलाचे निधन झाले. तर दुसरा मुलगा प्रफुल्ल मंडप बांधण्याचे काम करीत होता. मुलाच्या निधनानंतर त्यामधून सावरण्यासाठी तसेच दुसऱ्या मुलाचे भविष्य घडविण्यासाठी त्या काम करीत होत्या. मात्र, नियतीने त्यांना मुलापासून तोडले.
अंत्यसंस्कारावेळी मुलगा प्रफुल्ल याच्या भावनेचा बांध फुटला. मी त्या दिवशी कामाला गेलो नसतो तर माझी आई त्या दिवशी सुट्टी घेणार होती. मी कामाला गेलो म्हणून घरी मी एकटी काय करू, म्हणत आई कामाला गेली. आणि होत्याचे नव्हते झाले. मी जर त्या दिवशी कामाला गेलो नसतो तर माझी आई सुट्टी घेणार होती. आज मला हा दिवस पाहायला भेटला नसता.. असे म्हणत प्रफुल्ल धाय मोकलून रडत होता. हे पाहून उपस्थित सर्वच नातेवाईक सुन्न झाले.