पिंपरी : आजाराचे योग्य निदान न करता मनाला वाटेल तसे उपचार केले. उपचारांमध्ये केलेल्या हयगयीने व निष्काळजीपणामुळे पोलिसाची पत्नी असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लाईफ लाईन क्लिनिक, मेन रोड वाकड, विशाल नगर, जगताप डेअरी येथे १ ते ३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला.
मंजुषा ज्ञानेश्वर पिंगळे उर्फ मंजुषा संतोष भागवत (वय ४३) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. डॉ. प्रदीप एच. पाटील याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संतोष तुकाराम भागवत (वय ४८, रा. गुलमोहर कॉलनी, विशालनगर, जगताप डेअरी, औंध -वाकड रोड, पुणे) यांनी या प्रकरणी रविवारी (दि. १०) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष भागवत हे पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेत पोलीस हवालदार आहेत. शिक्षिका असलेल्या मयत मंजुषा या फिर्यादी भागवत यांच्या पत्नी होत्या. मंजुषा यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना १ सप्टेंबर २०१८ रोजी उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी मंजुषा यांना न्युमोनिया झालेला असताना डॉ. प्रदीप पाटील याने आजाराचे योग्य प्रकारे निदान केले नाही. निष्काळजीपणाने फक्त रक्ताची तपासणी करून प्लेटलेट्स कमी झाल्याचा निष्कर्ष काढला. तसेच मनाला वाटेल तसे उपचार केले. त्यानंतर ४ सप्टेंबर २०१८ रोजी फिर्यादी ची पत्नी मंजुषा यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यामुळे फिर्यादीने मंजुषा यांना पुढील उपचारासाठी थेरगाव येथील रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी उपचारादरम्यान मंजुषा यांचा ५ सप्टेंबर २०१८ रोजी मृत्यू झाला. न्युमोनियाच्या आजाराने मंजुषा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
फिर्यादी संतोष भागवत यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यांच्या अर्जावरून चौकशी करून पोलिसांनी याप्रकरणी साडेतीन वर्षांनंतर गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे तपास करीत आहेत.