ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 9 : पुण्याला हादरवणाऱ्या संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी हिच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयातील न्यायाधीश श्रीमती एल. एल. येनकर यांनी आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.
भारतीय दंडविधानाच्या १२० (कट रचणे) ३६६ (अपहरण) ३७६ ग (सामूहिक बलात्कार) ३०२ (खून), जबरी चोरी (३९७) मृताच्या शरीरावर असलेला ऐवज चोरणे (४०४) अशा सहा कलमांखाली आरोपींना दोषी ठरवले आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरीची सुटका करण्यात आली. शिक्षेची सुनावणी सकाळी 11 वाजता होणार होती. मात्र पोलिसांनी तासभर आधीच आरोपींना कोर्टात हजर केले, आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम यांना शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयाने या तिघांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली.
यावेळी आरोपी योगेशने आपल्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. मी गुन्हा केलेला नाही. गुन्ह्यात वापरलेली गाडी त्या दिवशी माझ्याकडे नव्हती. मला एक मुलगी, पत्नी आणि आई आहे. शिक्षा देताना त्याचा विचार व्हावा असा युक्तीवाद मांडला. माफीचा साक्षीदार झालेला राजेश चौधरीही गुन्ह्यात सहभागी होता. आम्हाला जर शिक्षा द्यायची असेल तर त्यालाही द्या अशी मागणी योगेश राऊत आणि विश्वास कदम यांनी केली. महेश ठाकूरलाही न्यायाधीशांनी पुढे बोलावून शिक्षेबाबत विचारलं, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.
काय आहे प्रकरण - नयना पुजारी कामावरून घरी जात असताना रात्री खराडी बायपास येथे उभ्या होत्या. इंडिका कॅब चालक योगेश राऊत याने नयना यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने मोटारीतून निर्जन भागातून घेऊन गेला. ३ मित्रांसह त्यांच्यावर तीनदा बलात्कार केला. नंतर खून करुन ओळख पटू नये म्हणून दगडाने चेहरा ठेचला. हा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात ८ऑक्टोबर 2009 रोजी दाखल झाला.
या गुन्ह्यातील मास्टर मार्इंड समजला जशरारा योगेश राऊत हा ससून रुग्णालयाच्या त्वचारोग विभागात दाखल असताना नैसर्गिक विधीच्या बहाण्याने १७ सप्टेंबर २०११ रोजी फरार झाला होता. गुजरातमधील वापी, बडोदा, पोरबंदर, सोमनाथ, द्वारका, अहमदाबाद, राजस्थानमधील अजमेर, चितोडगड, जयपूर अशा ठिकाणी विशेष तपास पथकाने राऊत याचा अथक शोध घेतला. पोलीसांना राऊत पंजाब, दिल्ली येथे असल्याची माहिती समजली. या माहितीचा पाठपुरावा करण्यासाठी तपास पथक मे महिन्यात दिल्लीमध्ये दाखल झाले. चिकाटीने तपास पथक काम करत असताना राऊत हा दिल्लीहून शिर्डीला रवाना झाल्याची माहिती समजली. या तपास पथकाने तात्काळ शिर्डी गाठली. ज्या ठिकाणी राऊत येणार होता़ तेथे सापळा रचला. शिर्डी बस ठाण्यात राऊतला पकडण्यात आले होते. या खटल्याचा निकाल लागण्यास ७ वर्षांचा कालावधी लागला. सरकार पक्षाकडून ३७ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. न्यायालयाने आज दोन्ही बाजुकडील युक्तिवाद ऐकून घेऊन तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.