पिंपरी : रस्त्याच्या कडेला दोन ट्रेलर थांबले होते. यातील एकाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे तो ट्रेलर त्याच्या पुढच्या ट्रेलरवर धडकला. यात ट्रेलरचा चालक जखमी झाला. मात्र दुसऱ्या ट्रेलरचा चालक चहा प्यायला गेल्याने तो या अपघातातून बचावला. मुंबई-बंगळुरू महामार्गावर ताथवडे येथे मंगळवारी (दि. ३) पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.शबीर खान (रा. मध्यप्रदेश) असे बचावलेल्या ट्रेलरचालकाचे नाव आहे. आशुतोष हृदयनारायण त्रिपाठी (वय २२, रा. इच्छापूर, हजिरा रोड, सुरत, गुजरात), असे जखमी ट्रेलरचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मंजित राजेंद्रसिंग चौधरी (वय ३३, रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी, मूळगाव जिताखोरी, ता. भवानीखेडा, जि. भिवानी, हरियाणा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुजाहिद कमरुद्दीन खान (वय ३०, रा. देवेसरम, ता. गोवर्धन, जि. मथूरा, उत्तरप्रदेश) असे आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे.हिंजवडी पोलीस ठाण्याचे हवालदार व्ही. एम. फडतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. जखमी त्रिपाठी हा त्यांचा ट्रेलरचा चालक आहे. ट्रेलरमधून ऑईल गळती होत असल्याने चालक त्रिपाठी याने त्याचा ट्रेलर मुंबई-बंगळुरू महामार्गावर ताथवडे येथे रस्त्याच्या कडेला थांबविला होता. त्याचवेळी शबीर खान याने त्याचा ट्रेलर त्रिपाठी याच्या ट्रेलरच्या पाठीमागे थांबविला होता. त्यानंतर त्रिपाठी आॅईल गळतीची पाहणी करण्यासाठी ट्रेलरच्या खाली गेले होते. तर शबीर खान चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी मुजाहिद खान याच्या भरधाव ट्रकने शबीर खान याच्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो ट्रेलर त्रिपाठी यांच्या ट्रेलरवर जाऊन धडकला. यात ट्रेलरचे चाक त्रिपाठी यांच्या पायावरून गेले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.दरम्यान ट्रकने दिलेली धडक इतकी जोरदार होती की, शबीर खान याचा ट्रेलर पुढच्या ट्रेलरला धडकला. यात शबीर याच्या ट्रेलरच्या इंजिनच्या पुढच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शबीर खान त्यावेळी चहा प्यायला गेल्याने तो ट्रेलरमध्ये नव्हता. त्यामुळे तो या अपघातातून सुदैवाने बचावला. तर धडक दिलेल्या ट्रकचा चालक मुजाहिद खान हा देखील यात किरकोळ जखमी झाला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
मृत्यू समोर उभा होता पण एका चहाच्या कपाने वाचवला त्याचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 9:22 PM