पिंपरी : वळण घेताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून तरुण रस्त्यावर पडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हिंजवडी येथील पॉवर हाऊस जवळ झाला. दुचाकी चालवताना तरुणाने हेल्मेट परिधान केले नव्हते. त्यामुळे त्याच्या डाेक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
अमन पांडे (वय 20, मूळ रा. मध्यप्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन हिंजवडी जवळील इंदिरा महाविद्यालयात बीबीए च्या दुस-या वर्षात शिकत होता. तो आज सकाळी त्याच्या नातेवाईक महिलेला आपल्या दुचाकीवरून (एम एच 12 / सी एम 2633) हिंजवडी येथील टीसीएस कंपनीत सोडण्यासाठी आला होता. महिलेला कंपनीत सोडून तो परत महाविद्यालयाकडे जात होता. हिंजवडी मधील पावर हाऊस जवळच्या वळणावर त्याचे त्याच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी स्लिप होऊन तो खाली पडला. गाडीचा वेग जास्त असल्याने तो घसरत गेला. तसेच त्याच्या डोक्याला हेल्मेट घातले नसल्याने गंभीर इजा झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान तो रस्त्यावर पडल्याने एका कारला धडकला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.