पिंपरी : शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन रुग्णांची संख्या १८० झाली आहे. एका ३५ वर्षीय महिलेचा मंगळवारी (दि. २५) मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या मृतांचा आकडा २४ झाला आहे.आॅगस्ट महिन्यामध्ये अचानक डोके वर काढलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. या जीवघेण्या आजाराची बुधवारी (दि. २६) ३ रुग्णांना लागण झाली. शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका महिला रुग्णाचा चिंचवड येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यू झालेली महिला चाकण परिसरातील रहिवासी होती. त्यांच्यावर १४ सप्टेंबरपासून चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या तीन दिवसांपासून दररोज एका रुग्णाचा मृत्यू होत असल्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याच्या संख्येमध्ये वाढच होत आहे.दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य विभागासह नागरिकांची चिंता वाढत आहे. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये गरोदर माता, उच्च रक्तदाब व मधुमेह असलेल्यांना मोफत लस देण्यात येत आहे. तसेच स्वाइन फ्लूच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस व टॅमी फ्लूच्या गोळ््या घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
स्वाइन फ्लूमुळे महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 2:28 AM