पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) रविवारी रात्रीच्या सुमारास अपघातग्रस्त तरुणाचा तातडीच्या उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्याने हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाला असून, लवकरात लवकर संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केली आहे.
अपघातग्रस्त तरुण घोडेगावचा असून, त्याचा दुचाकीवरून पडून अपघात झाला होता. या रुग्णाला तातडीने वायसीएम रुग्णालयात तातडीच्या विभागात दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी रात्रपाळीला एकच वैद्यकीय अधिकारी होते. अपघातग्रस्त रुग्णाच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असूनही डॉक्टर लक्ष देत नव्हते.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व विभागांत फोन केले. मात्र, त्या ठिकाणी इतर पेशंट असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सुमारे १५ ते २० मिनिटांनी या विभागात एक डॉक्टर आल्यानंतर रुग्णाच्या तोंडाला टाके टाकण्यास सुरुवात केली. परंतु, डॉक्टर शिकाऊ असल्याने टाके टाकता येत नव्हते. या एक तासाच्या कालावधीत रुग्णाच्या फुफ्फुसात व पोटात रक्त गेल्याने त्याचा मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी भोसले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली. दरम्यान, वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असल्यामुळे उपचारावेळी रुग्णांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
अपघातात जखमी रुग्णांच्या इतर अवयवांना मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे रक्तस्राव जास्त झाला होता. तसेच, या घटनेत डॉक्टरांची चौकशी केली जाणार असून, त्यामध्ये दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर, तातडीच्या विभागात दोन मुख्य वैद्यकीय अधिकाºयांच्या नेमणुकीसाठी प्रस्ताव देण्यात येणार आहे.- डॉ. मनोज देशमुख, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वायसीएम