पिंपरी : मोदी लाटेमुळे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे अन्य पक्षांतील इच्छुकांचा ओढा वाढला आहे. आयात उमेदवारांऐवजी पक्षातील निष्ठावान सदस्यांनाच प्राधान्य द्यावे, असा आग्रह धरण्यात येत आहे. त्यामुळे आयात कार्यकर्ते विरुध्द निष्ठावान असा नवा वाद भाजपात निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून काही संधीसाधू कार्यकर्ते भाजपात दाखल होत आहेत. त्यामुळे भाजपातील ज्येष्ठ कार्यकर्ते धास्तावले आहेत. याविषयी काहींनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या वेळी खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, रवींद्र भुसारी आणि पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारीसाठी राष्ट्रवादीसह अन्य पक्षातील लोक भाजपात प्रवेश करीत आहेत. अशा आयात उमेदवारांना प्राधान्य देण्यापेक्षा पक्षातील ज्येष्ठ आणि वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांचा विचार करावा, यावर चर्चा झाली आणि एकमतही झाले. (प्रतिनिधी)
आयात-निष्ठावान भाजपामध्ये वाद
By admin | Published: November 18, 2016 4:35 AM