पिंपरी : चार जणांना तब्बल १६ लाख रुपये उसने दिले होते. मात्र, पैसे वारंवार मागूनही परत न केल्याने मानसिक त्रासाला कंटाळून डेबू राजन खान (वय २८) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना दोन ऑक्टोबरला शिंदे वस्ती, सोमाटणे फाटा येथे घडली होती. या प्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद मंगळवारी (दि.१७) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित पांडुरंग सुर्यवंशी उर्फे देवा (रा.हडपसर, पुणे), प्रतिक जाधव (रा.भारती विद्यापीठ, पुणे), गणेश वाळुंज (रा.कात्रज नवी वसाहत, पुणे), आकाश बारणे उर्फे नन्या (रा.कात्रज, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेबु याने चार संशयितांना ८० हजार, ५० हजार, एक लाख, १४ लाख असे तब्बल १६ लाख ३० हजार रुपये उसने दिले होते. यातील काही पैसे डेबू याने बचत गटातून काढले होते. त्याला बचत गटाचा तसेच त्याच्या बँकेचा हफ्ता भरण्यासाठी पैशाची गरज होती. त्याने वारंवार संशयितांकडे पैशाची मागणी केली. संशयितांनी डेबु याला दिलेला चेक देखील बाउंन्स झाला होता. त्यामुळे संशयितांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून डेबू याने आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे.