लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव मावळ : चिटफंडात ठेवीच्या दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून मावळ तालुक्यातील अनेक गोरगरीब महिलांची ३० ते ३५ कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, याबाबत लोणावळा, वडगाव, कामशेत पोलीस ठाण्यात राजेश दत्तात्रय गायकवाड व त्यांची पत्नी सुनीता राजेश गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा महिन्यांपासून आरोपीचा शोध न लागल्याने फसवणूक झालेल्या महिला हतबल झाल्या असून, पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने या महिला कुटुंबासह गुरुवारी (ता. १८) तहसील कार्यालयात आमरण उपोषण करणार आहे. पोलीस अधीक्षक , उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना लक्ष्मीबाई घारे , वैशाली मातेरे , प्रतीक्षा खिलारे , रेखा डफळ , सविता काळे , शीतल चव्हाण , हिरा खिल्लारे , साधना वाघमारे , अरुणा कदम , लीला वाघमारे , मंदा काळे , शैला येवले या महिलांनी लेखी निवेदनात म्हटले आहे, की आरोपी पती-पत्नी असून त्यांनी आम्हाला रकमेच्या ठेवीवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ३० ते ३५ कोटींची फसवणूक केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली आहे. सर्वांचे जबाबही झाले आहेत. सहा महिने उलटूनही आरोपींचा शोध लागला नाही. वारंवार पोलिसांकडे विचारणा केली असता तपास चालू आहे असे उत्तर मिळते. त्यामुळे फसवणूक झालेल्या महिला हवालदिल झाल्या असून, त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
फसवणूक झालेल्या महिला करणार उपोषण
By admin | Published: May 10, 2017 4:02 AM