पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर हे पद शहराचे आहे. ते केवळ पक्षाचे नाहीत. ते वाकड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून चिंचवडच्या भाजपा नेत्यांना पोटशूळ झाला आहे. महापौरांविरुद्ध ठराव करण्याचा अधिकार स्थायी समितीला आहे का, अशी टीका शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केली.गेल्या महिन्यात वाकड, पुनावळे या प्रभागातील सहा विकासकामांचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी या प्रभागात शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे नगरसेवक आहेत. या कार्यक्रमाबाबत भाजपाच्या नेत्यांना न बोलविल्याने स्थायी समिती सभेत या कार्यक्रमासंदर्भात चौकशीचा ठराव केला होता. कार्यालयीन वेळेनंतर अधिकाऱ्यांनी कामकाज कसे केले, याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरून शिवसेना आणि भाजपात जुंपली आहे.महापालिका नाही आमदारांची जहागिरीभाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे थेट नाव न घेता शिवसेना गटनेते कलाटे म्हणाले, ‘‘महापालिका कोणाची जहागिरी नाही. पालिका ही आमदारांनी आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखा कारभार सुरू केला आहे. महापौरांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. वरिष्ठ अधिकाºयांना अर्वाच्च भाषेत सुनावले जात आहे. ही कार्यपद्धती विरोधकांना संपविण्याची आहे. प्रभागातील चारही नगरसेवक होते. महापौरही उपस्थित होते.नगरसेवकांनी एकत्र येऊन विकासकामे केल्यावर कोणाला पोटशूळ उठण्याचे कारण काय? चारही नगरसेवकांच्या विनंतीनुसार महापौरांनी शहराचे प्रथम नागरिक म्हणून कामांचे उद्घाटन केले. यामध्ये कोणाला डावलण्याचा हेतू नव्हता. परंतु, सत्ताधाºयांनी विकासकामांमध्ये घाणेरडे राजकारण केले आहे. अधिका-यांना बोलावून घेऊन दमदाटी केली. हे अत्यंत चुकीचे आहे.’’