किवळे : यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी सकाळी किवळे येथे टोलमुक्तीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने नेमलेल्या ठेकेदाराचे सर्व पैसे वसूल झाले आहेत. त्यामुळे हा मार्ग टोलमुक्त होणे गरजेचे असताना एप्रिलपासून टोलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. कोणाच्या फायद्यासाठी निर्णय घेतले जात आहेत. टोलमाफीचे आश्वासन खोटे ठरले असल्याने जनतेची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करीत द्रुतगती मार्गावर टोलमुक्ती मिळावी, महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी किवळे येथे द्रुतगती मार्गावर मुंबई बाजूला फलक हातात धरून ‘वसूल ठेकेदार का सब पैसा! फिर भी टोल कैसा?’, ‘झोल झोल झोल, पुणे-मुंबई टोल टोल टोल’, ‘टोलच्या मागे नक्की कोण?’, ‘टोलनाक्याच्या नीती कटू - आम आदमीचा पैैसा लुटू’, ‘कुठे नेऊन ठेवलाय टोलमुक्त महाराष्ट्र माझा? अशा विविध घोषणा देण्यास सुरुवात केली. आंदोलनादरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. पावणेबाराच्या सुमारास पोलीस आल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आंदोलनस्थळी पत्रके वाटली. त्यानुसार द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरील कंत्राटदाराची अपेक्षित टोल रक्कम जमा झाल्यावरही टोल का, असा प्रश्न उपस्थित केला.(वार्ताहर)
टोलविरोधात घोषणाबाजी
By admin | Published: April 24, 2017 4:55 AM