पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेता कार्यालय जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आटापिटा सुरू आहे. महापौर दालनासमोर आंदोलनाची भूमिका विरोधी पक्षनेत्यांनी घेतली असून, विरोधी पक्षनेत्यांनी आहे त्याच दालनाचा वापर करावा, स्वतंत्र जागा देणार नसल्याचे संकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सूचित केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती, विविध विषय समित्यांसाठी कार्यालये निर्माण केली होती. महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा राष्ट्रवादीला अपयश आले आहे. भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. त्यामुळे विरोधी पक्षात बसण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर गटनेत्यांची निवड झाली आहे. त्यामुळे सर्व गटनेत्यांना जागा देण्यात आल्या आहेत. यापूर्वी अनेक वर्षे काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद होते. या निवडणुकीत काँग्रेस शून्य झाली आहे. राष्ट्रवादीची सदस्यसंख्या ३६ आहे. मात्र, जागा कमी पडत असल्याचे कारण राष्ट्रवादी दाखवीत असली, तरी वास्तविक काँग्रेसची अपशकुनी जागा नको म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. गटनेते योगेश बहल यांनी महापौर आणि आयुक्तांकडे नवीन कार्यालयाची मागणी केली आहे. यासाठी राष्ट्रवादीचे नेते अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. परंतु विरोधी पक्षनेत्यांनी आहे त्याच दालनाचा उपयोग करावा, नवीन जागा देणे अशक्य असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)
विरोधी पक्षनेत्यांना स्वतंत्र जागेस नकार
By admin | Published: March 23, 2017 4:27 AM