देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची सन २०१८ची अंतिम मतदारयादी शनिवारी (दि.१५) प्रसिद्ध करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंटच्या सात वॉर्डात ३२ हजार ४२५ मतदार असून वॉर्ड क्रमांक चारमध्ये सर्वाधिक ६ हजार ५७४ मतदार आहेत. तर वॉर्ड क्रमांक सातमध्ये सर्वात कमी ३ हजार १८५ मतदार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मतदार संख्या ३ हजार ६१२ ने घटली आहे. नागरिकांना मतदारयादी पाहण्यासाठी बोर्डाच्या कार्यालयात उपलब्ध असल्याचे कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत यांनी सांगितले. देहूरोड कॅन्टोनमेंटने १९ एप्रिल २०१७ पासून हद्दीतील सात प्रभागांतील मतदारयादी तयार करणेसाठी शिक्षक प्रगणकांची नेमणूक केली होती. या प्रगणकांनी मतदारांच्या घरोघरी प्रत्यक्ष जाऊन कॅन्टोन्मेन्ट निवडणूक नियमानुसार बोर्डाने दिलेला ठराविक नमुन्यातील अर्ज प्रत्येक कुटुंबप्रमुखाकडून सहीनिशी भरून घेण्यात आला होता. १ मार्च २०१७ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण असणाऱ्या व बोर्ड हद्दीत राहणाऱ्यांची नावे मतदार यादीत समविष्ट करण्यात आली आहेत. मतदार यादी बनविताना व्यक्तीचे नाव, वय, पूर्ण पत्ता, ( घर क्रमांकासह ) ,अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती याबाबत माहिती घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते. कॅन्टोन्मेंट निवडणूक म नियम १७ अन्वये शनिवारी १५ प्टेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून १६ हजार ७१६ पुरुष मतदार असून १५ हजार ७०९ स्त्री मतदार आहेत. मतदारयादी मराठी व इंग्रजी भाषेत बनविण्यात आली आहे. मतदार संख्या ३ हजार ६१२ ने घटली : मतदार गेले कोठे ? गेल्या वर्षी कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत सात वॉर्डांत एकूण मतदार संख्या ३६ हजार ३७ इतकी होती. यात १८ हजार ७२८ पुरुष मतदार व १७ हजार ३०९ स्त्री मतदार होते. मात्र शनिवारी झालेल्या मतदारयादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २ हजार १२ पुरुष मतदार व एक हजार ६०० स्त्री मतदार असे एकूण ३ हजार ६१२ मतदार कमी झाले आहेत. नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असताना मतदार संख्या वाढण्याऐवजी अचानक एवढे मतदार कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वॉर्डनिहाय अंतिम मतदार २०१८
प्रभाग क्रमांक एक - ४४०१
प्रभाग क्रमांक दोन - ५२३७
प्रभाग क्रमांक तीन - ४१०५
प्रभाग क्रमांक चार - ६५७४
प्रभाग क्रमांक पाच - ४३५७
प्रभाग क्रमांक सहा -४५६६
प्रभाग क्रमांक सात - ३१८५
एकूण मतदारसंख्या - ३२४२५