पिंपरी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केली. तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी (दि. ७) सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन घोलप, बाळासाहेब शिंदे, दिनकर तेलंग व कैलास कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुधाकर विश्वनाथ वारभुवन (वय ५९, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी वारभुरवन आरपीआय (आठवले गट) या पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहेत. आरोपींनी रामदास आठवले यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. जाहीर निषेध, जाहीर निषेध, असा मेसेज टाकला. यातून आठवले यांची बदनामी केली. तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. त्यामुळे आरपीआयचे शहराध्यक्ष वारभुवन यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.एका कार्यक्रमानिमित्त रामदास आठवले पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी विडंबनात्मक काव्य सादर केले होते. यातून एका समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगून नाराजी व्यक्त करण्यात आली. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर, त्याबाबत दिलगीरी व्यक्त करून आठवले यांनी माफी मागितली होती. तसेच आरपीआय (आठवले गट) या पक्षातफेर्ही त्याबाबत दिलगीरी व्यक्त करण्यात आली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आठवले यांचा हेतू नव्हता, असे त्यावेळी पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. असे असतानाही सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर व्हायरल करण्याचा प्रकार समोर आला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही जणांकडून जाणूनबुजून असे कृत्य केले जात आहे. यामागे राजकीय हेतू आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबाबत पक्षाचे अध्यक्ष आठवले यांनी स्वत: माफी मागितली आहे. तसेच पक्षाकडूनही दिलगीरी व्यक्त केली आहे, असे आरपीआय (आठवले गट) पक्षाचे शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन यांनी सांगितले.