पिंपरी : गोवंश सदृश्य जनावर कापून विक्रीसाठी मांसाची विनापरवाना वाहतूक केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. देहूरोड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सेंट्रल चौक, देहूरोड येथे रविवारी (दि. १४) सकाळी ही कारवाई करण्यात आली.
सद्दाम इब्राहिम कुरेशी (वय २८, रा. इंद्रायणीनगर, लोणावळा), नईम कुरेशी (रा. आंबेडकरनगर, देहूरोड), अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलीस कर्मचारी नवनाथ मापारी यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सद्दाम याने वाहनामधून गोवंश सदृश्य जनावर कापून त्याचे मांस बेकायदेशीरपणे कोणताही परवाना नसताना लोणावळा ते देहूरोड अशी वाहतूक केली. याबाबत माहिती मिळाल्यांनतर देहूरोड पोलिसांनी सेंट्रल चौकात वाहनावर कारवाई केली.
यात दोन लाखांचे वाहन आणि ४५ हजारांचे मांस जप्त केले. आरोपी नईम याने हे मांस विक्री करण्यासाठी मागवले होते. पोलिसांनी सद्दाम आणि नईम या दोघांनाही अटक केली.