देहूरोड : देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावर देहूरोड लष्करी हद्दीत अशोकनगर-चिंचोलीपासून ते झेंडेमळा दरम्यानच्या अवघ्या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर पन्नासहून अधिक लहानमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना वाहनचालकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. निकषानुसार न बांधलेल्या व पांढरे पट्टे नसलेल्या दहा गतिरोधकांमुळे अपघात होत आहेत. येत्या शनिवारी संत तुकाराममहाराजांच्या बीजेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहूला येणाऱ्या वारकरी व भाविकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता असल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे . देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील देहूरोड ते झेंडेमळा दरम्यानचा रस्ता केंद्रीय आॅर्डनन्स डेपोच्या प्रवेशद्वारापर्यंत (सीओडी) देहूरोड लष्करी अभियांत्रिकी (एमईएस) या विभागाच्या ताब्यात असून, त्यांच्यामार्फत देखभाल व दुरुस्ती केली जाते. तसेच झेंडेमळा (कॅन्टोन्मेंट हद्द) ते केंद्रीय आॅर्डनन्स डेपो प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असली, तरी देखभाल-दुरुस्तीसाठी संबंधित रस्ता गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत देहू कमान ते झेंडेमळा दरम्यानचा रस्ता सुधारणा करण्यासाठी १२ कोटी ३७ लाख रुपये खर्चाच्या निविदेस मान्यता देण्यात आली असल्याने तुकाराम बीजेच्या पार्श्वभूमीवर तातडीने संबंधित रस्त्याची दुरुस्ती करायला हवी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या रस्त्यावरून तळवडे आयटी पार्ककडे ये-जा करणाऱ्या अभियंत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या चारचाकी खासगी मोटारी, चाकण एमआयडीसीकडे ये-जा करणारी वाहने, लष्करी वाहने, तसेच देहूगाव पंचक्रोशीतील २० गावांतील वाहनांची तसेच देहूगाव व भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून येणाºया भाविकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. अशोकनगर-चिंचोली भागात सर्वाधिक खड्डे पडले असून, या रस्त्यावर वाहनांची सर्वाधिक वर्दळ असल्याने रस्त्यावरील खड्डे चुकविणे अनेकदा शक्य होत नाही. वाहनचालकांना नाईलाजास्तव खड्ड्यात वाहने घालावी लागत असून, त्यामुळे वाहन आदळून त्यांचे नुकसान होत आहे. या खड्ड्यांची लांबी-रुंदी दिवसागणिक वाढत चालली आहे. सुरुवातीला लहान असणारे बहुतांश खड्डे खोलगट व पसरट होत चालले आहेत. अशोकनगर ते झेंडेमळा मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील लहानमोठे खड्डे रात्रीच्या वेळी चुकविताना दुचाकीस्वारांचा अपघात होत असून, चारचाकी वाहने खड्डे चुकविताना थेट अंगावर येत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. लष्करी हद्दीतील संपूर्ण रस्ता देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने ताब्यात घेऊन तातडीने दुरुस्ती करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी सदस्य व नागरिकांनी केली आहे .
अनधिकृत गतिरोधकच अपघाताला कारण देहूरोडच्या लष्करी हद्दीत सीओडी ते मुंबई-पुणे महामार्गादरम्यान एकूण १० ठिकाणी लष्कराच्या संबंधित विभागाकडून गतिरोधक बांधण्यात आले आहेत. हे गतिरोधक निकषानुसार बांधण्यात आलेले नसून काही ठिकाणी गतिरोधकावर धोकादायक खड्डे पडले आहेत. पांढरे पट्टे आखलेले नाहीत. पुढे गतिरोधक असल्याचे मार्गदर्शक फलक लावलेले नाहीत. रात्रीच्या वेळी गतिरोधक दिसण्यासाठी परावर्तक लावलेले नाहीत. वाहनचालकांना अचानक गतिरोधक दिसल्याने अपघात होत आहेत.
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्तेसुरुवातीला लहान असणारे बहुतांश खड्डे खोलगट व पसरट होत चालले आहेत. अशोकनगर ते झेंडेमळा मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील लहानमोठे खड्डे रात्रीच्या वेळी चुकविताना दुचाकीस्वारांचा अपघात होत असून, चारचाकी वाहने खड्डे चुकविताना थेट अंगावर येत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.