देहूगाव : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे व शासनाच्या लाल फितीत अडकलेल्या देहू-देहूरोड रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नुकताच एकाचा बळी गेला आहे़ या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी किती बळी जाणे अपेक्षित आहे, असा संतप्त सवाल देहूकर विचारत आहेत. दोन दिवसांपूर्वी देहू-देहूरोड रस्त्यावरील त्रैलोक्य पार्क या निवासी सोसायटीच्या समोर संदीप भोसले या तरुणाचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू झाला. याचे प्रमुख कारण म्हणजे या रस्त्याच्या एका बाजूला रस्त्यावर आलेले पाणी व त्यामुळे निसरडा झालेला रस्ता तसेच दुसऱ्या रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेला रस्ता हे प्रथमदर्शी दिसून येते. तळवडे शीव ते देहूगाव कमान आणि तेथून पुढे झेंडेमळा येथील सीओडी प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरीत करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी ग्रामस्थांकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र या रस्त्यामध्ये बाधित क्षेत्र किती याची मोजणी व नकाशा तयार करणे व मोबदला देणे हे काम बाकी आहे. यामुळे या रस्त्याचे काम रखडलेले असल्याचे सूत्रांकडून समजते. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.देहू-देहूरोड रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले होते़ मात्र त्याने ते काम मध्येच थांबविले आहे. त्याने रुंदीकरणासाठी केलेली खोदाई काही ठिकाणी तशीच आहे तर काही ठिकाणी खडी टाकण्यात आली आहे. त्या मार्गाचे रुंदीकरण केले नसल्याने रस्ता ठिकठिकाणी अरुंद झाला आहे. सोसायट्यांचे पाणी थेट रस्त्यावरच येत असल्याने रस्ता खड्डेमय व निसरडा झाला आहे. त्यामुळे एका तरुणाचा बळी गेला आहे. या रस्त्यावर दोन वाहने एकाच वेळी एकमेकांच्या समोरून आली असता वाहनचालकांचा अंदाज चुकतो.
देहूगाव : लाल फितीत तरुणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 1:13 AM