पिंपरी : फसवणुकीच्या गुन्ह्यातील न्यायालयाचे समन्स देण्यासाठी आलेल्या दिल्लीपोलिसांना आरोपींच्या घरातील महिलांसह पुरुषाने मारहाण केली. त्याच बरोबर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकल्याची घटना चिखलीत घडली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक केली आहे.
संदीप रामदास साबळे, कमल रामदास साबळे, सुनिता संदीप साबळे, सरिता दीपक साबळे (सर्व. रा. रामदासनगर चिखली) यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, संदीप साबळे याला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्रकुमार नंदलाल सहरावत (वय ३९, स्पेशल स्टाफ, न्यू दिल्ली डिस्ट्रीक्ट) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिल्लीतील पार्लामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यामध्ये दीपक साबळे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पटियाला हाऊस कोर्टाने साबळे याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्याचे समन्स देण्यासाठी दिल्लीतील पोलीस पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. पोलीस पथक बुधवारी (दि. १६) दुपारी पावणेतीनच्या सुमारास आरोपीच्या घरी गेले. त्या वेळी साबळे याच्या घरच्यांनी त्यांचा ठावठिकाण्याची माहिती दिली नाही. उलट घराचे लोखंडी गेट जारदार ओढले. यात फिर्यादींचे हाताचे बोट गेटमध्ये अडकले. त्यानंतर घरच्यांनी फिर्यादीच्या हाताची बोटे पिरगळली. तसेच, बुक्क्यांनी मारहाण केली. त्याच बरोबर फिर्यादींचे सहकारी संजीव यांच्या डोळ्यात मीरचीपूड टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.