पिंपरी : स्थळ... चिंचवडगावातील अशोक बाफना यांचे निवासस्थान..., वेळ सायंकाळची..., प्रवेशदाराशी काढलेली सुंदर रांगोळी..., घरातील मंडळींची कार्यक्रमासाठी सुरू असलेली लगबग..., नटून थटून आलेल्या सुवासिनी..., सनई-चौघड्याचे सुरू..., अशा या मंगलमय वातावरणात 'लक्ष्मी आणि गौरी' या दोघी गो-मातांचा डोहाळ जेवण सोहळा साजरा करण्यात आला.अंगावर हिरव्या रंगाचा झुल... गळ्यात फुलांच्या माळा... पायात पैंजण... या दोघी मायलेकींचे कौतुक का तर दोघींच्या डोहाळ जेवणाची जंगी तयारी करण्यात आली होती. मग काय महिला मंडळाने या दोन जीवांच्या लक्ष्मी आणि गौरीच्या भाळी कुमकुम तिलक लावून औक्षण करून पूजा केली. त्यांची मोठ्या प्रेमाने ओटी भरली. मिष्ठान्नासह आवडते खाद्य त्यांना भरविण्यात आले.बाफना म्हणाले, की हिंदु धर्मात गो-मातेला खूप महत्त्व आहे. जैन समाजातदेखील गो-मातेला अनन्य साधारण महत्त्व दिले असून तिचा सांभाळ केल्यास कुटुंबाला मिळणारे समाधान, ऊर्जा याविषयी महत्त्व सांगितले आहे. महाभारतामध्ये महर्षी गुरु वसिष्ठ ऋषींनी सुध्दा गो-मातेचे महत्त्व विषद केले आहे. तुप आणि दुध देणारी, तुपाची उत्पत्ती स्थान, तुप मिळवून देणारी, दुधा-तुपाची नदी जीच्यामुळे वाहते ती गो-माता माझ्या घरात सदा निवास करू दे, माझ्या हृदयात गाईचे तूप असू दे. संपूर्ण शरीरात तूप रहावे, मनातपण असावे, गो-माता माझ्या आजूबाजूस चारही दिशांना असाव्यात. मी गो-मातेच्या सहवासात सदासर्वकाळ असावे, असे सांगितले आहे. जैन समाजात गाईला महत्त्व असल्याने आपल्याकडेही एक गाय असावी. अशी इच्छा होती. परंतु तेशक्य होत नव्हते.त्यानंतर नगर जिल्ह्यातील नेवासे येथून एक गाय आणि वासरू घेतले. घरात आणले. त्यांचे लक्ष्मी आणि गौरी असे नामकरण केले. गोमातेमुळे स्थैर्य आल्याने या दोघींचे डोहाळ जेवण करण्याचा निर्णय घेतला आणि सोहळा साजरा केला. कार्यक्रमास शरद बोथरा, मदनलाल कर्नावट, किशोर चोपडा उपस्थित होते. बाफना म्हणाले, जिने संपूर्ण चराचर सृष्टीला व्यापून टाकले आहे, अशी ती भूत आणि भविष्यकाळ घडविणारी जननी गो-मातेस विनम्र अभिवादन करणे गरजेचे आहे. 'लक्ष्मी-गौरी' या दोन्ही मायलेकींची सुवासिनींनी पूजा करून डोहाळ जेवण केले.
...अन् रंगला गोमातेचा डोहाळ जेवण सोहळा; पिंपरीतील बाफना परिवाराची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 5:03 PM
मंगलमय वातावरणात 'लक्ष्मी आणि गौरी' या दोघी गो-मातांचा डोहाळ जेवण सोहळा चिंचवडगावातील अशोक बाफना यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देमंगलमय वातावरणात 'लक्ष्मी आणि गौरी' या दोघी गो-मातांचा डोहाळ जेवण सोहळा साजराभूत आणि भविष्यकाळ घडविणारी जननी गो-मातेस विनम्र अभिवादन करणे गरजेचे : बाफना