चाकण - सोशल मीडियावर राजकीय नेते, पोलीस अधिकारी, पत्रकार व प्रतिष्ठित व्यक्तींच्या विरोधात अवमानकारक व आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी करणाऱ्या व खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या तथाकथित समाजसेविका संगीता वानखेडे हिच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची मागणी खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी राम पठारे व चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्याकडे पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्नित खेड तालुका हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाने निवेदनाद्वारे केली आहे.मागील काही वर्षांपासून चाकण परिसरात तथाकथित समाजसेविका म्हणून वावरणारी संगीता वानखेडे हिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होऊनही व सकल मराठा समाजाने सात दिवसांत अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा देऊनही चाकण पोलिसांनी तिला अद्याप अटक केली नाही. ती राजरोसपणे फिरत असून तिला त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. हि महिला सोशल मीडियावर राजकीय नेते, पोलीस अधिकारी, पत्रकार व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह लाईव्ह व्हिडीओ व पोस्ट टाकून सातत्याने बदनामी करीत आहे. याची सायबर क्राईमने विशेष दखल घेऊन सायबर क्राईम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार संघाने केली आहे.चाकण परिसरात हि महिला अवैध धंदे चालकांकडून तिने नेमलेल्या हस्तकांमार्फत दरमहा लाखो रुपयांचा हप्ता गोळा करीत आहे, याची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. चाकण परिसरात स्वतःची दहशत माजविण्यासाठी वेळोवेळी तिने फ्लेक्स लावून ४० ते ५० तरुणांची टोळी तयार केली आहे. या टोळीच्या माध्यमातून लोकांना नाहक त्रास देऊन खंडणी गोळा करीत आहे. रस्तोरस्ती तिने काही लोकांना टपऱ्या व हातगाड्या मांडण्यास सांगून त्यांच्याकडून दरमहा हप्ते गोळा करीत आहे. या महिलेने काही पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. या महिलेच्या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात येऊन चाकण परिसरातील कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी या महिलेला तडीपार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.या महिलेस समाजातील काही व्यक्ती पाठीशी घालून तिच्या दुष्कृत्याला खतपाणी घालतात, त्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच या महिलेने अनेक राजकीय नेते, समाजसेवक यांच्या नावाचा गैरवापर करून व्हाट्सअप व फेसबुक सारख्या सोशल मीडियावर तिचे प्रस्थ वाढविण्याचा प्रयत्न केला असून या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी पत्रकार संघाने केली आहे.तसेच हप्ते न देणाऱ्या अनेकांच्या विरुद्ध विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करूनही तिच्यावर काहीच कारवाई होत नाही, यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. महिला असल्याचा गैरफायदा घेऊन ती राजरोसपणे लोकांना ब्लॅक मेल करून धमक्या देत आहे. त्यामुळे या महिलेवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे.
‘त्या’ खंडणीखोर महिलेला अटक करून तडीपार करण्याची नागरिकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 6:49 PM