पिंपरी : स्वच्छ भारत अभियानासंदर्भातील विषय सर्वसाधारण सभेपुढे चर्चेस आल्यानंतर ‘स्वच्छतागृहां’वरून स्थायी समिती सभापती सीमा सावळे आणि माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ‘नेहरुनगरातील स्वच्छतागृह पाडणाºयांवर फौजदारी दाखल झालीच पाहिजे, असे सावळे म्हणाल्या. वादंग अधिक वाढू लागल्याने महापौरांनी स्वच्छभारत अभियानाच्या धर्तीवरीलस्वच्छ महाराष्टÑ अभियानाचा विषय मंजूर केला.महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. या विषयावर चर्चा होताना सुरुवातीला दत्ता साने यांनी ‘‘अनधिकृत बांधकामे, शास्तीबाबत विशेष सभा होणार होती. पक्षनेत्यांना या विषयाचा विसर पडला आहे. ती कधी घेणार ते सांगावे. अनधिकृत बांधकामे धोरण आणि शास्तीने नागरिक भयभीत आहेत, अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाची सद्य:स्थिती सभागृहापुढे यावे,’’ अशी मागणी केली. त्यावर महापौरांनी योग्य वेळ कळविली जाईल, असे सांगितले.त्यानंतर डॉ. वैशाली घोडेकर यांनी आपल्या भागातील स्वच्छतेचा प्रश्न सांगितला. त्या म्हणाल्या, ‘‘एचए मैदानावर मोठ्या प्रमाणावर काही लोकांनी पाले टाकली आहेत. या लोकांसाठी स्वच्छतागृह नसल्याने रस्त्यावरच शौचास जावे लागत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. या गोष्टीचे प्रशासनास गांभीर्य नाही.’’ त्यावर सीमा सावळे यांनी नेहरुनगरातील ‘स्वच्छतागृह’ पाडल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून दोन्ही सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.सावळे म्हणाल्या, ‘‘एकीकडे स्वच्छतागृह पाडायचे आणि दुसरीकडे तक्रारी करायच्या नेहरुनगरातील स्वच्छतागृह पाडण्याबाबत प्रशासनाने कोणती कारवाई केली ही माहिती द्यावी.’’ त्यावर ‘तुम्ही वैयक्तिक बोलू नका. ज्यांनी पाडले असेल त्यांच्यावर कारवाई करा. असंसदीय बोलू नये, असे घोडेकर म्हणाल्या. त्यावर संतप्त झालेल्या सावळे म्हणाल्या, ‘‘एकीकडे कारवाई होऊ नये, म्हणून आमच्या नेत्यांच्या पाया पडायचे आणि दुसरीकडे मी स्वच्छ असल्याचा आव आणायचा. हे चुकीचे आहे. प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल करावा. नाही तर मला तुमच्या विरोधात अॅक्शन घ्यावी लागेल.’’स्वच्छता अभियनाच्या विषयाला मंजुरीसावळे आणि घोडेकर यांच्यामधील वाद अधिक वाढू लागल्याने सुरुवातीला महापौरांनी घोडेकर यांना खाली बसा, अशी सूचना केली. तरीही आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले म्हणून दोघींनीही खाली बसावे, असा आदेश महापौरांनी दिला. तरीही वाद मिटला नाही. म्हणून महापौरांनी स्वच्छ भारत अभियानाचा मूळ विषय मंजूर केला.
स्वच्छतागृह तोडणा-यांवर फौजदारी , सर्वसाधारण सभेत मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 3:12 AM