मावळ विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला देण्याची मागणी - संजय जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 01:30 AM2018-12-24T01:30:47+5:302018-12-24T01:30:57+5:30
मावळ विधानसभा मतदारसंघ कॉँग्रेस पक्षाला मिळावा याकरिता मागणी लावून धरण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी दिली.
लोणावळा : मावळ विधानसभा मतदारसंघ कॉँग्रेस पक्षाला मिळावा याकरिता मागणी लावून धरण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी दिली. पक्षाच्या जनसंपर्क अभियानाची सुरुवात जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोणावळ्यातून झाली.
मावळ विधानसभा व लोकसभा हे मतदारसंघ आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्याने मावळात कॉँग्रेस पक्षाला मरगळ आली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉँग्रेस पक्षाला मावळात प्रतिनिधित्व मिळत नसल्याने तालुक्यातून पंजा हद्दपार होऊ लागला आहे. तसेच मावळात सलग २५ वर्षे राष्ट्रवादीला गटबाजीमुळे पराभवाचा सामना करावा लागत असल्याने मावळ विधानसभा मतदारसंघ आघाडी झाल्यास कॉँग्रेस पक्षाला मिळावा ही तालुक्यातील नेत्यांची मागणी आहे. कॉँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील घटकापर्यंत पोहचविण्याचे काम या जनसंपर्क अभियानातून करण्यात येणार आहे. या अभियानामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल. तळागाळातील नागरिक, वाड्या-वस्त्या व घराघरांत कॉँग्रेसची विचारधारा पोहचेल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. या वेळी लोणावळा शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, प्रवक्ते प्रमोद गायकवाड,निखिल कविश्वर, दत्तात्रय गवळी, सुधीर शिर्के, संध्या खंडेलवाल, पूजा गायकवाड, संजय घोणे, पुष्पा भोकसे, सिंधू कविश्वर, सुबोध खंडेलवाल, पप्पू नासिर, दत्ता दळवी उपस्थित होते.