पिंपरी : महापालिकेच्या नागरवस्ती विभाग व महिला बालकल्याण विभागातील कामांचा पंचनामा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केला. योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद ठेवली जाते. परंतु, त्याचा वापर होत नाही. लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळत नाही. बेजबाबदार आणि कामचुकार अधिकारी बदला अशी मागणीही सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत राबविण्यात येणाºया मागासवर्गीय युवकांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसाहाय्याचा धनादेश प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाचे नावे काढण्यात येतो. त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या नावे धनादेश किंवा ईसीएसद्वारे लाभ देण्यात यावा, अशी दुरुस्ती करण्याचा विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता. या विषयावर बोलताना सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षांतील नगरसेविकांनी नागरवस्ती विभागाच्या कामावर टीका केली.माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, ‘‘परदेशातील शिक्षणासाठी सर्व घटकातील युवकांना अर्थसाहाय्य करावे, विद्यार्थ्यांना लाभ वेळेत मिळणे गरजेचे आहे. पात्र-अपात्रतेची यादी त्वरित करणे गरजेचे आहे. दहा वर्षे पूर्ण झालेल्या बचत गटांना अद्यापही लाभ दिला नाही. किरकोळ कारणांवरून फाईल रखडविल्या जातात. नागरवस्ती विभागाचे अधिकारी मन लावून काम करत नाहीत. त्यांची बदली करा.’’स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या विषयाला नोव्हेंबरमध्ये मान्यता दिली. परंतु, अजूनही प्रशिक्षण सुरूझाले नाही. अधिकाºयांचे कामावर लक्ष नसते. नगरसेवकांनी दूरध्वनी केल्यावर व्यस्त असल्यास त्या पुन्हा दूरध्वनीदेखील करीत नाहीत. आयुक्तांनी त्यांच्याकडे पदभार दिला आहे.’’आशा शेंडगे म्हणाल्या, ‘‘नागरवस्ती विभागातील अधिकाºयांकडून वेळेत माहिती दिली जात नाही. माहिती घेण्यासाठी दमबाजी करावी लागते.’’नागरवस्तीचा ढिसाळ कारभारअधिकारी व्यवस्थित माहिती देत नाही. जागेवरदेखील ते हजर नसतात, असा आरोप उषा मुंढे यांनी केला. योजना नागरिकांपर्यंत पोहचत नाहीत. ढिसाळ कारभार सुरू आहे. पात्र-अपात्रतेचा घोळ घातला जातो. छोट्या चुकांवरुन अर्ज अपात्र ठरविले जातात. विद्यार्थ्यांना वेळेत लाभ मिळत नाही, अशी टीका अनुराधा गोफणे यांनी केली. सुजाता पालांडे म्हणाल्या, ‘‘योजना चांगल्या आहेत. परंतु, त्याची काटेकोरपणे अंमलबाजवणी केली जात नाही. योग्य वेळी विद्यार्थ्यांना लाभ मिळत नाही. पात्र-अपात्रतेची यादी वेळीच जाहीर करणे गरजेचे आहे. अधिकारी मनमानी पद्धतीने काम करतात.’’झामा बारणे, नीता पाडाळे, माई घुले, प्रियंका बारसे यांनी सहभाग घेतला.
कामचुकार अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी; सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर नगरसेवकांकडून टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 5:35 AM