पिंपरी : संत व महापुरुषांबाबत अपशब्द वापरून संभाजी भिडे यांनी जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शहरातील विविध संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी गुरुवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता दळवीनगर येथून पोलिस आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.
संभाजी भिडे यांच्याकडून अपशब्द वापरून संत व महापुरुषांचा अवमान केला जात आहे. तसेच तिरंगा व राष्ट्रगीताबाबतही चुकीचे बोलून देशवासीयांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याप्रकरणी भिडे यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची कारवाई न करता पाठीशी घालण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे देशप्रेमी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीसाठी २८ जून तसेच २९ जुलै २०२३ रोजी पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. संभाजी भिडे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील पुरोगामी विचारांचे पक्ष, पुरोगामी विचारांच्या संघटना तसेच विविध सामाजिक संघटना यांच्यातर्फे महामोर्चा काढण्यात येणार आहे. संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संभाजी काळे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक दिले आहे.