लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर लोणावळ्याजवळ असलेल्या वरसोली टोलनाक्यावर एकवीरा देवीच्या भक्तांना टोलमाफी करा, अशी मागणी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.वेहेरगाव येथील कार्ला गडवासिनी एकवीरा देवीच्या यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात होत आहे. षष्ठी, सप्तमी व अष्टमी हे यात्रेचे मुख्य दिवस असल्याने रायगड जिल्ह्यातील लाखो कोळी, आग्री, कुणबी बांधव देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. त्यांना द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका येथे टोल भरावा लागतो, तसेच वरसोली हद्दीतील कुसगाव टोलनाका व एक किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर वरसोली टोलनाका येथे पुन्हा टोल भरावा लागतो आहे. वरसोली टोलनाका येथे टोल भरून भाविक फक्त कार्ला फाटा येथे ३ किमी अंतराचा रस्ता वापरतात. ही भाविकांची लूट असल्याने वरसोली टोलनाक्यांवर भाविकांना टोलमाफी करावी, अशी मागणी तरे यांनी बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)
भाविकांना टोलमाफी देण्याची मागणी
By admin | Published: March 23, 2017 4:16 AM