पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) वतीने महात्मा गांधी यांच्या विचारांनी भारलेल्या ‘महात्मा आॅन सेल्युलॉइड’ या भारतीय चित्रपटांच्या पोस्टर्सचे खास प्रदर्शन येरवडा कारागृहात भरविण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित केला आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते एनएफएआयच्या उपसंचालक कीर्ती तिवारी व जेल अधीक्षक यु. टी. पवार यांच्या उपस्थितीत झाले. याव्यतिरिक्त मुंबईतील राजभवनात देखील हे प्रदर्शन आयोजित केले. या चित्रपटांच्या पोस्टर्सचे उदघाटन राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते केले. एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, संतोष अजमेरा, एनएफएचएमचे ओ. एस. डी यांच्या उपस्थितीत केले.राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शिकवण कळावी यादृष्टीने त्याच्या विचारांनी भारलेल्या चित्रपटांच्या पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित केले आहे. विशेषत: भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपला बराच काळ महात्मा गांधी यांनी येरवडा कारागृहात व्यतीत केला आहे. प्रामुख्याने येरवडा कारागृहातील कैद्यांना महात्माजींची शिकवण ज्ञात होण्यासाठी हे प्रदर्शन कारागृहातच आयोजित केले आहे. हेच प्रदर्शन ३ ते ७ आॅक्टोबर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (लॉ कॉलेज रस्ता) देखील आयोजित करणार आहे.महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून येत्या वर्षभरात महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन या चित्रपटांच्या पोस्टर्सचे प्रदर्शन देशातील वेगवेगळ्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे.- प्रकाश मगदूम,संचालक, एनएफएआय