पिंपरी - पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते, हे पहायचंय? इरसाल, मार्मिक, हळूच चिमटा काढणाऱ्या पुणेरी पाट्यांची सर्वांत मोठी मेजवानी खास पिंपरी-चिंचवडच्या रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणेकर जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी आपली स्वत:ची ओळख निर्माण करतात. पुणेकरांचा अभिमान पुणेरी पाट्यांच्या सर्वांत मोठ्या प्रदर्शनातून झळाळून निघणार आहे. ८ व ९ जुलै रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत चिंचवड येथील चापेकर चौकाजवळील गंधर्व हॉलमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांच्या मिश्कीलपणाचा आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांच्या स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती, पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वलर्स प्रस्तुत मेन्स अॅव्हेन्यूच्या सहयोगाने रविवारी व सोमवारी ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित केले आहे. राहुल कलाटे व राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेज (भोसरी) हे सहप्रायोजक आहेत. आइस्क्रीम पार्टनर ‘खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी’, आऊटडोअर मीडिया पार्टनर धीरेंद्र, व्हेन्यू पार्टनर कर्तव्य फाउंडेशन आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अभिनेत्री प्रियंका यादव व गायिका श्रावणी रवींद्र यांच्या हस्ते होणार आहे. ‘आम्ही खाण्याचे पैसे घेतो; अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही’, एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये’, ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते’, ‘आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत; त्यामुळे तुमच्या गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही’, ‘आमचं कुत्रं ९९ जणांना चावलंय, तुम्ही बेसावध राहिलात, तर त्याची सेंच्युरी पूर्ण होईल’ अशा पाट्या दृष्टीस पडू लागल्या, की तुम्ही नक्की पुण्यातच आहात हे सुज्ञास सांगणे न लगे ! पुणेरी पाट्यांमधून स्वत:च्या व्यंगावर बोट ठेवण्याचं धाडस दाखवत चपखल शब्दांमधून मार्मिक टिप्पणीही झळकते याच पाट्यांमधून..! याला वयाचं बंधन नाही, शिक्षणाची अट नाही. अगदी एखादा मुलगाही मार्मिक शब्दांत भलामोठा आशय व्यक्त करतो व एखादे वयस्कर आजोबाही ‘या रस्त्यावरचा सिग्नल विमानालाही उपयोगी पडतो’ असे म्हणू शकतात.-खडूस, खत्रूड, खवचट व तरीही हवेहवेसे वाटणारे या पाट्यांमधील शब्द अस्सल पुणेकरांची तैलबुद्धी दाखवतात व त्यांचा खास पुणेकरी बाणाही ! हा बाणा प्रदर्शनातून खास पद्धतीने अनुभवता येणार आहे.- चिंचवड येथील चापेकर चौकजवळील गंधर्व हॉलमध्ये रविवारी (दि. ८ जुलै) व सोमवारी (दि. ९ जुलै) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून ते विनामूल्य आहे.
पुणेरी पाट्यांचे चिंचवडला आजपासून प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 1:27 AM