लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या वेळी भाविकांना डेंगी आणि स्वाइन फ्लूबाबत माहिती देऊन योग्य त्या सोयीसुविधा पुरवाव्यात. स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, अशी सूचना अपर तहसीलदार गीतांजली शिर्के यांनी येथील आढावा बैठकीत केल्या.पालखी सोहळा तयारीसाठी मंगळवारी देहूगाव ग्रामपंचायत कार्यालयात पिंपरी चिंचवडच्या अपर तहसीलदार गीतांजली शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. प्रशासकीय तयारी, संस्थान, आरोग्यविभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एसटी, पीएमपी, पोलीस प्रशासन, विद्युत विभाग आदींचा आढावा घेण्यात आला. पालखी सोहळ्यापर्यंत योग्य तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग व तीर्थक्षेत्र विकास आराखडा विभागाचे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. सध्या डेंगी व स्वाइन फ्लू साथ सुरू असल्याने भाविकांना योग्य त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात. स्वतंत्र कक्ष सुरू करावा. देहूरोड ते निगडी या भागात टँकरची व्यवस्था करावी आदी सूचना शिर्के यांनी केल्या. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कोहीनकर, पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे, सरपंच सुनीता टिळेकर, माजी सरपंच हेमा मोरे, ग्रामपंचायत सदस्य राणी मुसुडगे, दीपाली जंबुकर, उषा चव्हाण, तसेच महेश मोरे, शैला खंडागळे, संस्थानचे विश्वस्त सुनील मोरे, विश्वजित मोरे, मंडलाधिकारी सूर्यकांत पाटील, तलाठी खैरे, पंचायत समितीचे शाखा अभियंता बाळासाहेब मखरे, तळेगाव दाभाडे एसटी आगारप्रमुख तुषार माने, पी. एन. शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एम. खरात, आरोग्य सहायक डी. यू. ढवळे, पीएमपीचे निगडी आगारप्रमुख व्ही. डी. परदेशी, पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक अ. न. गोसावी, महावितरणच्या सहायक अभियंता कविता ढाके आदी उपस्थित होते.ग्रामसेवक गणेश वालकोळी यांनी सांगितले की, पालखी सोहळ्याबाबत विविध विभागांशी पत्रव्यवहार पूर्ण झाला असून, समन्वय साधला आहे. पाचशे शौचालयांची मागणी करण्यात आली असून, तीनशे उपलब्ध आहेत. गटविकास अधिकारी कोहिनकर म्हणाले की, शासनाने रक्कम उपलब्ध करून दिली असल्याने अतिरिक्त शौचालये लवकरच उपलब्ध होतील. गतवर्षी प्रमाणे नियोजन करून जागा निश्चित करावी. मावळ भागातील कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चार ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. चार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून, पैकी एक कार्डियाक असणार आहे. तीस ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. नियमित पाणी तपासणी, हॉटेल तपासणी, डेंगी, स्वाइन फ्लू रुग्ण सर्वेक्षण, दोन वेळा धूरफवारणी करण्यात येईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खरात यांनी सांगितले.
डेंगी, स्वाइन फ्लूसाठी कक्ष
By admin | Published: May 11, 2017 4:29 AM