पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड शहरात आज दौरा असल्याने महापालिकेसमोर मोठ्या प्रमाणावर नो पार्किंग मध्ये वाहने उभी करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोरील दोन्ही रस्त्यावर नो पार्किंग मध्ये वाहने उभी केली होती.
एव्हाना नो पार्किंग मधील वाहनांवर कारवाई करण्यात वाहतूक पोलीस सजग असतात. मात्र आज येथील कोणत्याही वाहनावर कारवाई करण्यात आली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केली असल्याने रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे मोरवाडी ते पिंपरी चौकापर्यंत काही काळ वाहतूक कोंडीचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागला. वाहतूक पोलिसांचे नो पार्किंगमधील वाहनांकडे होत असलेले दुर्लक्ष, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.