पिपरी: पिंपरी-चिंचवड ते पुणे या मेट्रो प्रकल्पांचा आढावा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास घेतला. संत तुकारामनगर स्टेशनवर मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रो प्रवासही केला. मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेऊन सूचनाही केल्या.उपमुख्यमंत्री पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यात त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रकल्पांचीही पाहणी केली. वेळ पाळणे हा पवार यांचा गुणधर्म असल्याचा प्रत्यय आज मेट्रो अधिकाऱ्यांना आला. शहरातील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी शहरात पहाटे सहालाच पोहोचले होते. सव्वा सहाच्या सुमारास फुगेवाडीत दाखल झाले होते. सुरूवातीला मेट्रोच्या कार्यालयात कामाच्या प्रगतीसंदर्भातील बैठक घेतली. यावेळी मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित, गौतम बि-हाडे, सरला कुलकर्णी उपस्थित होते. दीक्षित यांनी सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. तसेच संगणक सादरीकरणही दाखविले.
.........................मेट्रोचे पहिले तिकीट पवारांनामेट्रो अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर पवार यांच्या गाड्यांचा ताफा संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावर आला. पाहणी दौऱ्यात मोजके पोलीस अधिकारी आणि मेट्रो कर्मचारी उपस्थित होते. सुरूवातीला कामांचा आढावा घेतल्यानंतर मेट्रोचे पहिले तिकीट हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. त्यानंतर मेट्रोच्या डब्यात गेले. संत तुकारामनगर ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोने प्रवास केला. मेट्रो चालकाच्या केबिनमध्ये थांबून उपमुख्यमंत्री यांनी आढावा घेतला. यावेळी ब्रिजेश दीक्षित यांनी त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. मेट्रो संदर्भात अजित पवार यांनी काही सूचना देखील केल्या. मेट्रोच्या कामासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पवारांचा ताफा पुण्याकडे मार्गस्थ झाला.