पिंपरी : महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागातून शहरात विविध उद्योग व्यवसायांना परवाने आणि ना हरकत प्रमाण देण्यात येतात. या परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्रावर एका महिला लिपिकाने विभाग प्रमुख असलेल्या उपायुक्तांच्या बनावट सह्या मारुन ना-हरकच प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आकाशचिन्ह व परवाना विभागात शहरातील छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय परवाने दिले जातात. महापालिकेचे आकाशचिन्ह व परवाना उपायुक्त संदीप खोत यांच्या बनावट स्वाक्षरी करुन त्या लिपिक महिलेने कुदळवातील भंगार व्यावसायिकांना ना हरकत दाखले दिले होते. त्या ना हरकत प्रमाणपत्रावरुन व्यावसायिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी प्रस्ताव पाठविला होता. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे यापुर्वी पाठविलेले परवानगी प्रस्ताव आणि आता पाठविलेल्या प्रस्तावावरील स्वाक्षरीत फरक दिसला. याविषयी संशय आल्याने उपायुक्त संदीप खोत यांना प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिला.
त्यानुसार चारही ना हरकत दाखल्यावरील स्वाक्षरी आपण केलेल्या नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी केलेल्या चौकशीत संबंधित विभागातील महिला लिपिकाने बनावट स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. त्या संबंधित महिला लिपिकाने उपायुक्त संदीप खोत यांच्यासमोर सदरील सह्या मीच केल्याचे कबूल देखील केले आहे.
उद्योग, व्यवसाय परवान्याचे कामकाज करणाऱ्या लिपिकाने चार ना हरकत प्रमाणपत्रावर माझ्या बनावट सह्या केलेल्या आहेत. या महिलेने सह्या केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाला पत्र देवून त्या लिपिकांवर योग्य ती कारवाई करावी असे कळविले आहे. तसेच त्या महिलेची तात्काळ बदली केली आहे.
- संदीप खोत, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका.
महिला लिपिकाने उपायुक्तांचा बनावट सह्या करुन ना हरकत प्रमाणपत्र दिले आहेत. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे. यापुर्वी त्या महिलेने आणखी किती उद्योग व व्यवसाय परवाने दिले आहेत का? त्यांनी आणखी कोणाच्या सह्या केलेल्या आहेत का? याविषयी चौकशी करण्यात येत आहे. संबंधित महिला लिपिकाचे सेवानिलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे ठेवला आहे. आयुक्त शेखर सिंह हे सुट्टीवर आहेत. त्यामुळे ते आल्यानंतर त्या महिला लिपिकाचे कारवाई केली जाईल.
- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, महापालिका.