पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्यास केवळ चार दिवस राहिले असताना अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रमुख पक्षांनी अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे, तर उमेदवारीचीही प्रतीक्षा इच्छुकांना आहे.महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. १२८ जागांसाठी चारसदस्यीय प्रभागरचनेनुसार ३२ प्रभागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारीअर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये तयार केली असून, अर्ज दाखल करणे, मतदान आणि मतमोजणीचे नियोजन केले आहे. शुक्रवारपासून उमेदवारीअर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अजून अर्ज दाखल झालेले नाहीत. बंडखोरीच्या भीतीने कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. चार दिवसांत केवळ पाच अर्ज दाखल झाले आहेत. इच्छुक उमेदवारांना मतदार यादीची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)उमेदवारीयादी : पाच अर्ज दाखलमहापालिकेच्या निवडणुकांसाठी सोमवारी एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत. ६, १४, २७ व २८ या प्रभागासाठी भरले गेले आहेत. आजअखेर एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक सहामध्ये जागा ड-खुला प्रवर्गासाठी योगेश पंडित गवळी यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. भाग क्रमांक चौदामध्ये जागा ब - खुला महिला प्रवर्गासाठी ज्योत्स्ना भंडारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून, प्रभाग क्रमांक २७ मध्ये जागा अ-अनुसूचित जातीसाठी शिरसाठ काका भागवत यांनी राष्ट्रवादीतर्फे, प्रभाग क्रमांक २८ मध्ये जागा ड- खुल्या प्रवगार्साठी नीलेश रावडे यांनी एक अपक्ष व एक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे असे दोन अर्ज भरले आहेत, असे एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी प्रभाग क्रमांक एकतीसमधून क खुला महिला प्रवर्ग या जागेसाठी श्वेता इंगळे यांनी राष्ट्रवादीतर्फे अर्ज, तर प्रभाग क्रमांक पाचमधून अ-ओबीसी या जागेसाठी योगेश गवळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. रविवारचे दोन आणि सोमवारचे पाच असे एकुण सात अर्ज दाखल झाले आहेत.
इच्छुकांचा जीव टांगणीला
By admin | Published: January 31, 2017 4:15 AM