पिंपरी : आचार्य अत्रे रंगमंदिराचे नुकतेच नुतणीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी ४ कोटी ६९ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र या रंगमदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू आहे. त्यामुळे कोटी रुपये खर्च करून थिअटरचे रुप पालटण्याऐवजी त्याला समस्यांचे ग्रहण लागले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील आचार्य अत्रे रंगमंदिराला कलाकारांची पसंती आहे. अनेक व्यावसायिक नाटकांच्या तालमी या थिअटरमध्ये होतात. वातानूकूलन यंत्रणा नसल्याने थिअटरचे बुकिंग कमी होत होते. त्यामुळे महापालिकेने या थिअटरचे रुप पालटण्याचा निर्णय घेतला. बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, फ्लोरिंग, साउंड सिस्टीम, वातानुकूलन यंत्रणा याचा नूतणीकरणामध्ये समावेश करण्यात आला. त्यासाठी तब्बल ४ कोटी ६९ लाख रुपये खर्च करण्यात आले. सहाशे आसनक्षमता असलेल्या या थिअटरच्या नुतणीकरणाचे काम देव कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या विनोद मोटवानी या ठेकेदाराला देण्यात आले होते. मार्च २०१९ मध्ये हे काम पूर्ण झाले. मात्र कामामध्ये अनेक त्रुटी असल्याने रंगमंदिराच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे थिअटरच्या परिसरामध्ये बादल्या ठेवून पाणी भरण्याची वेळ आली आहे.
रंगमंदिराच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या कलाकारांसह नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गळती होणाऱ्या पाण्यासाठी आवारामध्ये बादल्या ठेवण्यात आल्या आहेत. विद्युत विभागाचे काम बाकी असल्यामुळे ज्या ठिकाणी पाणी गळती होत आहे, तिथे दरवाजा ठेवण्यात आला होता. त्यामधून पाणी गळती होत असल्याचे स्पष्टीकरण स्थापत्य विभागाकडून देण्यात आले आहे. मात्र नूतणीकरणासाठी कोटी रुपये खर्च करूनही कलाकार व नागरिकांच्या पदरी निराशा पडली आहे.
‘‘दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पाणी गळती होणाऱ्या भागाच्या वर डांबराच्या सिट टाकल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये काम पूर्ण होईल. त्यानंतर पाणीगळती होणार नाही. ’’
- प्रदिप पुजारी, कार्यकारी अभियंता, ‘ह’ प्रभाग.