पिंपरी : केंद्र सरकारने एचए कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी १०० कोटी रुपये कर्ज स्वरूपात देण्यासह कंपनीच्या मालकीची ८७ एकर जागा विक्री करण्यास परवानगी दिली आहे. यातून कंपनीला नवसंजीवनी मिळणार ही कामगारांसाठी आनंददायी बाब आहे. मात्र, ही शेवटची संधी मानून कोणत्याही परिस्थितीत कंपनी टिकवून ठेवायची, असा निर्धार हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्सच्या (एचए) कामगारांनी व्यक्त केला आहे. एचए कंपनीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीही १३८ कोटींचे पॅकेज दिले होते. मात्र, काही वर्षांतच कंपनी पुन्हा अडचणीत आली. कामगारांचे वेतन थकले. कामगारांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. दरम्यान, आता पुन्हा कंपनीला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. ही शेवटची संधी मानून कामगारही कंपनीच्या उत्पादन वाढीसाठी सज्ज झाले आहेत. वेळ पडल्यास अधिकचे काम करू, सरकारचे उद्दिष्ट पार पाडू, भविष्यात कंपनीवर अशी वेळ येऊ देणार नाही, कंपनी टिकविण्यासाठी आव्हानांचा सामना करू, असा निश्चय कामगारांनी लोकमतच्या व्यासपीठावर केला आहे. दरम्यान, हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनी पुनरुज्जीवनाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कंपनीला नवसंजीवनी मिळावी यासाठी शंभर कोटींचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयाचे स्वागत करीत एचए कामगारांनी गुरुवारी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलालाची उधळण करण्यात आली. ‘कामगार एकजुटीचा विजय असो, हम सब एक है’ अशा घोषणा देण्यात आल्या. एचए कंपनीबाबत गेले अनेक वर्षे चर्चा सुरू होती. कंपनी निर्णय होत नसल्याने कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. अनेक कामगारांच्या चुलीही पेटत नव्हत्या. त्यांच्याकडे गॅस सिलिंडर घेण्याएवढे पैसेही नव्हते. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे कामगारांना आनंद झाला आहे. कंपनीतील उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत कामगार वर्गातून व्यक्त होते आहे.
‘एचए’ टिकवून ठेवण्याचा निर्धार
By admin | Published: December 24, 2016 12:25 AM