भोसरी : गवळीनगर प्रभाग क्रमांक पाचमधील सर्व आरक्षणे ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उद्याने, क्रीडासंकुल, विरंगुळा केंद्र, बॅडमिन्टन हॉल आदी विकसित केल्याने प्रभागाचा चेहरामोहरा बदलला आहे. प्रभागात सर्वाधिक विकासकामे केल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वांत विकसित प्रभागात गवळीनगरचा क्रमांक लागतो. त्यामुळे मतदार निश्चितपणे विकासकामालाच मते देतील, असा आशावाद नगरसेवक अजित गव्हाणे यांनी गवळीनगर प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसद्वारे घेतलेल्या कोपरा सभेत व्यक्त केला.या वेळी नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार वसंत लोंढे, नगरसेविका अनुराधा गोफणे, कोमल फुगे आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. गव्हाणे म्हणाले, ‘‘प्रभागात आरक्षित जागी सखूबाई गबाजी गवळी उद्यान, गंगोत्री पार्क, राधानगरी उद्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान आदी उद्यानाबरोबरच क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पै. धोंडिबा क्रीडा संकुल, बॅडमिन्टन हॉल आदी विकसित केले. त्याचप्रमाणे विरंगुळा केंद्रामुळे ज्येष्ठ नागरिकांना एकमेकांशी हितगूज साधण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे. या प्रभागात पॅनलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसद्वारे अनुभवी नगरेसवक वसंत लोंढे यांच्याबरोबरच सुशिक्षित उमेदवार दिल्याने प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’या वेळी वसंत लोंढे म्हणाले, ‘‘सांप्रदायिक वारसा जतन करण्यासाठी प्रभागात संत तुकाराममहाराज मंदिरासह विविध धार्मिक मंदिरांची उभारणी करून दर वर्षी त्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमासह कीर्तन सप्ताहाचे आयोजन करून तरुणांमध्ये संत साहित्याची आवड निर्माण केली.’’ प्रभागात महिला व्यायामशाळा बांधून झाली असून ती लवकरच महिलांठी खुली होणार असल्याची माहिती नगरसेविका गोफणे यांनी दिली. (वार्ताहर)
विकासकामालाच मतदारांची साथ असेल
By admin | Published: February 13, 2017 1:48 AM