पिंपरी : पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकासाचा भार पिंपरी-चिंचवड महापालिकेला सोसावा लागणार आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार महापालिकेला पाच कोटी रुपयांचा निधी बीज भांडवल म्हणून पीएमआरडीएला द्यावा लागणार आहे. त्या विषयीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.राज्य सरकारच्या ३१ मार्च २०१७च्या अधिसूचनेनुसार पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, ग्रामीण भागातील काही नगरपालिका व महानगराभोवतीच्या गावांसाठी प्रादेशिक विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची हद्द ४ एप्र्रिल २०१५ च्या अधिसूचनेनुसार मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रादेशिक क्षेत्रात येणाºया स्थानिक स्वराज्य संस्थांना पीएमआरडीएचे नियम लागू झाले आहेत.‘पीएमआरडीए’कडून संपूर्ण हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक बीज भांडवलापोटी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून १० कोटींचा निधी सम प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आदेश १८ नोव्हेंबर २०१६ रोजी देण्यात आले आहेत.त्यानुसार आपल्या हिश्श्यातील पाच कोटी रु पयांचा निधी पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमआरडीएला देणार आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाकडील भू-संपादन निधी लेखाशीर्षातून हा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या बुधवारी होणाºया सभेत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या विकासाचा भार महापालिकेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 5:09 AM