लोणावळा : महाशिवरात्री निमित्त लोणावळा शहरातील प्राचिन देवालय असलेल्या रायवुड उद्यानातील स्वयंभु सिध्देश्वर व नागफणी डोंगरावरील स्वयंभु लिंग असलेल्या नागफणेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. नागफणी डोंगरावरील नागफणेश्वराचा मध्यरात्री बारा वाजता रुद्राभिषेक सुरु झाला. कुरवंडे गाव स्थानिक नागरिक व लोणावळा परिसरातील भाविकांनी हा अभिषेक करत पहाटे एक वाजता आरती करण्यात आली. सह्याद्री पर्वत रांगेतील उंच सुळक्यावर हे स्वयंभु लिंग असल्याने याठिकाणाला मावळातील अमरनाथ संबोधले जाते. देवाधी देव इंद्र देवांनी याच ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्या केली असून याच ठिकाणाहून पवित्र इंद्रायणी नदीचा उगम असल्याने याठिकाणाला अनन्य साधारण महत्व आहे. कुरवंडे ग्रामस्तांनी इंद्रायणी नदीचे उगमस्थान असलेल्या ठिकाणी रात्रभर भजन केले. पहाटेपासून डोंगराचा परिसर भाविकांनी गजबजला होता. कुरवंडे शिवसेना शाखा यांच्या वतीने भाविकांना मोफत पाण्याची सोय केली होती. रायवुड उद्यानातील प्राचिन देवालय असलेल्या सिध्देश्वर मंदिरा पहाटे तिन वाजता देवस्थान ट्रस्टी व पुजारी यांनी विधिवत अभिषेक, पुजा व आरती करत देवालय दर्शनासाठी खुले केले. पहाटेपासून याठिकाणी सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी लोटली होती. महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र दर्शन रांग बनविण्यात आल्या होत्या. देवस्थान समितीचे अध्यक्ष जगदिश निंबाणे, उपाध्यक्ष धिरुभाई टेलर, सचिव दत्तात्रय गवळी, गणेश गवळी, राजकुमार भोगशेट्टी, संतोष चोरडीया, गामाण्णा कुंभार, रामलिंग संगोळ्ळी यांच्यासह व्हिपीएस हयस्कूलचे स्काऊट गाईंड पथक भाविकांच्या सेवेसाठी मंदिर परिसरात सज्ज होते. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता लोणावळा शहर पोलीसांनी मंदिरा परिसरात तसेच मार्गावर मोठा बंदोबस्त नेमला होता. लोणावळा व ग्रामीण पंचक्रोशीतून याठिकाणी येणारे भाविक व लहान मुलांकरिता अनेक प्रसाद, फराळ व खेळण्यांची दुकाने लागली होती. बेल फुल वाले भल्या पहाटेपासून मंदिर परिसरात दुकाने थाटून बसले होते. रायवुड उद्यानातील ढेरेदार वृक्षाच्या छायेतील स्वयंभु सिध्देश्वराचे देवालय व मंदिर परिसरात अल्हाददायी वातावरणाचा आनंद घेत भाविक तासंतास या परिसरात रममान होताना दिसत होते.
लोणावळा शहरातील स्वयंभु नागफणेश्वर व सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 4:07 PM